
वडगावातील भुयारी पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे
वडगाव मावळ, ता.१७ : येथील केशवनगरला जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम त्वरित पूर्ण करून तो नागरिक व वाहनांसाठी सुरू करावा, अशी मागणी वडगाव शहर भाजपने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम इंदुजी दुबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शहराध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, किरण भिलारे, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, ऍड. विजयराव जाधव, रवींद्र म्हाळसकर, काशिनाथ तोडकर, शरद मोरे, हरीश दानवे आदी उपस्थित होते. वडगाव शहरामधील केशवनगर, सांगवी या भागाला जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने रेल्वे गेट हे वारंवार जास्त कालावधीसाठी बंदच असते. त्यामुळे ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्ग, दुग्ध व्यावसायिक, बाजार घेणेसाठी येणारा महिलावर्ग या सर्वांना ताटकळत थांबावे लागते. काही वर्षांपूर्वी रेल्वेने हाती घेतलेले भुयारी मार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना नाहक त्रास व वेळेचा खोळंबा होत आहे. रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला देखील गेट उघडण्याची वाट पाहत बसावी लागत आहे. त्यामुळे त्याच्या जीवीत्वास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गेट बंद असल्यास दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अपूर्ण राहिलेल्या रेल्वे भुयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे. केशवनगर व सांगवी येथील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय त्वरित दूर करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.