तिकोणा गडाचा विकास आराखडा तयार विविध कामांसाठी मदत ः गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिकोणा गडाचा विकास आराखडा तयार
विविध कामांसाठी मदत ः गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचा पुढाकार
तिकोणा गडाचा विकास आराखडा तयार विविध कामांसाठी मदत ः गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचा पुढाकार

तिकोणा गडाचा विकास आराखडा तयार विविध कामांसाठी मदत ः गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचा पुढाकार

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १९ ः गेल्या अनेक वर्षांपासून तिकोना किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या वडगाव येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेने तिकोना गडाचा शास्त्रशुद्ध संवर्धन विकास आराखडा तयार करून घेतला आहे. त्यामुळे गडावर सुधारणांची विविध कामे करण्यासाठी राजाश्रय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशा प्रकारचा किल्ल्याचा आराखडा बनविणारी राज्यातील ही पहिलीच संस्था आहे.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांची झालेली दुरवस्था दूर व्हावी, गडास शिवकाळाप्रमाणे वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था शिवभक्तांच्या सहकार्याने तिकोना गडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. परंतु गडावर दुर्गसंवर्धनाचे काम करताना असंख्य अडचणी येतात. त्यात प्रामुख्याने शासकीय पातळीवरील परवानगी, आर्थिक निधी, मनुष्यबळ, शास्त्रीय दृष्टीने करावयाचे संवर्धन कार्य आदी समस्यांना तोंड द्यावे लागते. गडकिल्ले हे शासनाच्या ताब्यात असल्याने त्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करायचे झाल्यास शासकीय बाबी पूर्ण करणे क्रमप्राप्त असते. या बाबींची पूर्तता करण्यासाठी गडाचा कायदेशीर व प्रमाणित विकास आराखडा करण्याबाबत संस्थेला पुरातत्त्व विभागाकडून वारंवार विचारणा होत होती. हे काम खर्चिक होते. परंतु ते अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने संस्थेने हे काम हाती घेतले. पुरातत्त्व खात्याच्या पॅनेलवरील वास्तुविशारद आफळे असोसिएट यांना हे काम देण्यात आले. त्यांनी गडावर प्रत्यक्ष येऊन बारकाईने पाहणी करून ड्रोन शूट व इतर अत्याधुनिक साधनासह तिकोना गडाचा विकास आराखडा तयार केला. यासाठी एक लाख रुपये खर्च आला. अशा प्रकारचा आराखडा तयार करणारी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था ही पहिलीच संस्था ठरली आहे. आराखड्यात गडावरील दरवाजे, कमानी व तटबंदीची दुरुस्ती व मजबुतीकरण, वितंडेश्वर मंदिर व परिसर सुधारणा, माहिती केंद्र, गडाच्या पायथ्याला प्रसाधन गृह आदी बाबींचा समावेश आहे. वडगाव मावळ येथे नुकत्याच साजऱ्या झालेल्या विजय दिनाचे औचित्य साधून या आराखड्याचे अनावरण करण्यात आले. हा आराखडा पुरातत्त्व खात्याचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून, तो पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पुरातत्त्व खात्याकडे सादर करण्यात आला आहे.

- आराखड्यामुळे होणारे फायदे -
* गडावर विविध विकासकामे करण्यासाठी शासकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
*वास्तुविशारद यांच्याकडून गडावरील सर्व वास्तूंच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आल्यामुळे आता गडावरील वास्तूंच्या दुरुस्तीसाठी पुरातत्त्व विभागाकडून वारंवार परवानगी घेण्याची गरज नाही.
*दुसऱ्या संस्थांना परवानगीसाठी द्यावा लागणारा वेळ न घालवता त्यांच्या आर्थिक नियोजनानुसार गडावरील छोटे किंवा मोठे काम आराखड्यावरून थेट चालू करता येणार.
* शासनाकडून निधी मिळाल्यानंतर गडावर मोठ्या प्रमाणात गडसंवर्धनाचे काम चालू होणार.
*या आराखड्याच्या संदर्भाने दर वर्षी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा.
* गडावरील अतितात्काळ दुरुस्त करावयाच्या वास्तूची यादी या माध्यमातून उपलब्ध.

‘‘विकास आराखडा तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडण्यासाठी ज्यांनी -ज्यांनी सहकार्याने केले. त्या ज्ञात-अज्ञात शिवभक्तांचे मन:पूर्वक आभार. या आराखड्यामध्ये आता गडाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.
- किरण चिमटे,
गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था, वडगाव मावळ.