
‘वडगावातील पुलाची उंची, रुंदी वाढवावी’
वडगाव मावळ, ता. २१ : येथील ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिराजवळ असलेल्या पुलाची उंची व रुंदी वाढवून दोन्ही बाजूला एक एक मीटरचे स्लॅब टाकावेत अशी मागणी श्री. पोटोबा देवस्थान ट्रस्टने केली आहे.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, विश्वस्त गणेश ढोरे, सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे, ॲड. तुकाराम काटे, ॲड. अशोक ढमाले, अरुण चव्हाण, किरण भिलारे, सुनीता कुडे आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वडगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे पंचायत समिती, तहसील कार्यालय, न्यायालय, दुय्यम निबंधक कार्यालय, बँका, शैक्षणिक संस्था असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची वडगावमध्ये वर्दळ असते. मंदिराजवळील पूल अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते. काही वर्षांपूर्वी येथे नवीन पूल बांधण्यात आला. परंतु जुन्या पुलापेक्षा त्याची रुंदी दोन मीटरने कमी करण्यात आली आहे. ही बाब तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, पुलाच्या दोन्ही बाजूला एक एक मीटरचा स्लॅब टाकून देतो. परंतु अद्याप पर्यंत तो टाकला नाही. मागील दोन वर्षात पावसाचे पाणी पुलावरून गेल्याने धोका निर्माण झाला होता. खोली कमी असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येते. सध्या आमदार निधीतून रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करावी व दोन्ही बाजूला एक एक मीटरचा स्लॅब टाकून द्यावा. जेणेकरून रस्त्याच्या कामाबरोबरच पुलाचेही काम होईल.