
महिला दिनानिमित्त आज व्यवसा मार्गदर्शन शिबिर
वडगाव मावळ, ता. ८ ः जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव नगरपंचायत, महिला व बालकल्याण समिती व लर्निंग लिंक फाऊंडेशनच्यावतीने शहरातील सर्व महिला बचत गट व महिलांसाठी गुरुवारी (ता. ९) महिला सक्षमीकरण व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत वडगाव नगरपंचायतीने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. वडगाव नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी दुपारी दोनला हा कार्यक्रम होईल. या व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात प्रशिक्षक स्वाती दुधाळे या आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, उद्योजकता विकास, मार्केटिंग, उद्योग रजिस्ट्रेशन, उद्योग संधी शोधन, बँक जोडणी, बिझनेस प्लॅन, उद्योगास साह्य करणाऱ्या संस्था आदींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. बिझनेस प्लॅन सिलेक्ट झालेल्या महिलांना बक्षीस तसेच सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शहराची स्वच्छता निरंतर टिकवून ठेवणाऱ्या वडगाव नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे तसेच शहरातील ९ ते २० या वयोगटातील मुलींसाठी वडगाव नगरपंचायत आयोजित मर्दानी खेळ व कराटे मोफत प्रशिक्षण या मावळ दुर्गा अभियानाचे शस्र पूजन करून उद्घाटन करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा वहिले यांनी केले आहे.