महसूल व पंचायत समितीचे कामकाज ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महसूल व पंचायत समितीचे कामकाज ठप्प
महसूल व पंचायत समितीचे कामकाज ठप्प

महसूल व पंचायत समितीचे कामकाज ठप्प

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १९ : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने मावळ तालुक्यातील कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. विशेषतः महसूल व पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे.
जुनी पेन्शन योजना सुरू करावी, या मागणीसाठी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचा-यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यात मावळ तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या विविध संघटना, ग्रामसेवक संघटना, वैद्यकीय संघटना, पंचायत समिती कर्मचारी संघटना, महसूल, तलाठी व मंडलाधिकारी संघ अशा जनतेशी निगडित विविध संघटनांचा त्यात सहभाग असल्याने दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार व नायब तहसीलदार वगळता सर्व कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे जनतेची बहुतांशी कामे ठप्प झाली आहेत. सर्व प्रकारच्या केसेस लांबणीवर पडल्या आहेत. तलाठी व मंडल अधिकारी नसल्याने विविध प्रकारचे दाखले व उतारे मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. पंचायत समितीमध्ये वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी वगळता सर्व कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, शिक्षण, कृषी, बांधकाम, पाणी पुरवठा आदी जनतेशी निगडित विभागांच्या खात्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज विस्कळित झाले आहे. नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळत नाहीत. मार्च महिन्यात करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्याची लगबग सुरू असते. या महिन्यात मोठ्या प्रमाणावर करवसुली केली जाते. मात्र ग्रामसेवक नसल्याने ही करवसुली ठप्प झाली आहे. त्याचा गावातील छोट्या-मोठ्या विकास कामांवर परिणाम झाला आहे. शिक्षक संघटना संपात सहभागी असल्या तरी सुमारे ५० टक्के शिक्षक शाळांवर हजेरी लावत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात शाळा सुरू आहेत.

ग्रामीण भागात गैरसोय
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा सेविकांच्या मदतीने सुरू ठेवल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. विशेषतः बाह्य रुग्ण विभाग व उपचार केंद्र सुरू असले तरी विविध प्रकारचे लसीकरण मात्र बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.