भातासाठी ‘एसआरटी’चा वाढता अवलंब

भातासाठी ‘एसआरटी’चा वाढता अवलंब

Published on

वडगाव मावळ, ता. १८ : भाताचे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी तसेच मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एसआरटी तथा सगुणा राइस तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. एसआरटी ही भात लागवडीची पद्धत रायगड जिल्ह्यात सुरू झाली. परंतु मावळ तालुक्यातही ही पद्धत आता शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

मावळ तालुक्यात भात हेच खरिपाचे मुख्य पीक आहे. सुमारे तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. त्यात सुमारे ७० टक्के क्षेत्रावर इंद्रायणीचे वाण घेतले जाते. तालुक्यातील हजारो शेतकरी पूर्व पारंपरिक पद्धतीने भाताचे उत्पन्न घेत आहेत. गेल्या काही वर्षात भात शेती करणे अधिक खर्चिक झाले आहे. भात शेतीसमोर काही संकटे उभी राहिली आहेत. त्यात प्रामुख्याने कमी उत्पादन व शेतमजुरांची समस्या तीव्र बनली आहे. बदलते नैसर्गिक हवामान आणि खतांमुळे जमिनींचा घसरलेला पोत यामुळे भाताचे उत्पादन कमी होताना दिसत आहे. तर औद्योगीकरणामुळे मोठा वर्ग नोकरीकडे वळल्याने शेतीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. या समस्येवर मात करून भातशेती जगवण्यासाठी आणि उत्पादकता वाढीसाठी एसआरटी ही पद्धत शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि सोईची ठरत असल्याचे दिसून आले आहे.

भात लागवडीचा खर्च वाचवणे, श्रमाची बचत करणे आणि उत्पादन वाढवणे हा या पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. एसआरटी लागवड पद्धतीत नांगरणी, चिखलणी आणि लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचतो आणि उत्पन्नही वाढण्यास मदत होते. ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीचा कर्ब वाढतो आणि उत्पादकताही वाढते. भात कापणीनंतर इतर पिकेही घेतली जाऊ शकतात. यामुळे शेतीचे उत्पादन आणि उत्पन्नही वाढते. एसआरटी लागवड पद्धतीमुळे भात लागवडीचा खर्च पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी होतो. लावणी करावी लागत नसल्याने पन्नास टक्के श्रम कमी होते. जमिनीची धूप २० टक्क्यांपर्यंत थांबवता येते. रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर येऊ शकतो. भात आठ ते दहा दिवस आधी तयार होतो. मावळ तालुक्यात पवन मावळ भागात या पद्धतीने भात लागवड करण्याचे प्रमाण वाढले आहे. अधिक हेक्टर जमिनीवर एसआरटी पद्धतीने भात लागवड होत असल्याचे दिसत आहे.

‘‘सगुणा राइस तंत्र हे उखळनी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यावर बी टोकनी करून भात पिकविण्याचे उत्तम तंत्र आहे. या पद्धतीत वापरलेल्या गादी वाफ्यामुळे भात रोपांच्या मुळाशी सुयोग्य प्रमाणात तसेच पुरेसा ओलावा राहतो. साच्यामुळे दोन रोपातील नेमके व सुयोग्य अंतर व प्रति एकर रोपाची संख्या नियंत्रित करता येऊ शकते.’’
- ए. आर. पिरजादे, कृषी सहायक, आंबी

‘‘पवन मावळ भागातील अनेक शेतकरी एसआरटी पद्धतीने भात लागवड करत आहेत. त्याचा फायदा होत असल्याने दर वर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. या पद्धतीमध्ये उत्पादन जास्त मिळत असल्याचे व लावणीचे कष्ट वाचल्यामुळे ५० टक्के त्रास कमी होतो. कोळपणी करण्याची गरज नाही. रासायनिक खतांच्या गरजेचे प्रमाण निम्म्यावर येते. पावसाचा ताण पडला तरी जमीन भेगाळत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा.’’
- नवीनचंद्र बोऱ्हाडे, कृषी पर्यवेक्षक, वडगाव

VDM23B05727

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.