नियोजित रेल्वे उड्डाणपूलाला शेतकऱ्यांचा विरोध

नियोजित रेल्वे उड्डाणपूलाला शेतकऱ्यांचा विरोध

वडगाव मावळ, ता.४ : वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र, या कामामध्ये कोणत्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र जाईल ? हे निश्चित करण्यासाठी आवश्यक क्षेत्राची प्रथम मोजणी करुन द्यावी, असा प्रस्ताव ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांनी मांडला. त्याला संबंधित शेतकऱ्यांनी संमती दिल्याने लवकरच या क्षेत्राची मोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी नियोजित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा महामंडळाच्या (महारेल) अधिकाऱ्यांनी नुकतीच बाधित शेतकऱ्यांची पंचमुखी मारुती मंदिराच्या प्रांगणात बैठक घेतली. उड्डाणपुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी तीव्र विरोध दर्शविला. तसेच पुलाची जागा बदलण्याची मागणी केली.
या बैठकीला ‘महारेल’च्या पुणे कार्यालयातील अधिकारी महेश ढेमरे, ज्ञानेश्वर साळुंखे, अनिकेत पाटील, रूप सिंग, हमीद शेख, भूषण बिडवे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण, माजी नगरसेवक दिनेश ढोरे, मारुती चव्हाण, नितीन चव्हाण, बाळासाहेब तुमकर, ज्ञानेश्वर ढोरे, विराज हिंगे, संजय दंडेल, अर्जुन ढोरे, गणेश ढोरे, श्रीनिवास गोरे आदी उपस्थित होते.
यापूर्वी वडगावच्या रेल्वे फाटकाच्या जागेवर भुयारी मार्ग करण्याचे काम सुरू होते. परंतु, त्याला विरोध झाल्याने नंतर तो रद्द करण्यात आला. या भागाची भविष्याची गरज लक्षात घेऊन येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या प्रकल्पात जमिनी गेल्यास भूमिहीन होण्याची भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर, उड्डाण पुलाच्या कामासाठी जेवढे आवश्यक तेवढेच व कमीत कमी क्षेत्र संपादित केले जाईल. तसेच बाधित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला दिला जाईल, असे आश्वासन ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांनी दिले.

पुणे-लोणावळा मार्ग रेल्वेफाटक मुक्त होणार
- पुणे ते लोणावळा मार्गावरील सर्व रस्ते टप्प्याटप्याने फाटकमुक्त उद्दिष्ट्य.
- काही रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्ग तर काही ठिकाणी उड्डाणपुलाचे नियोजन.
- वडगाव येथील रेल्वे फाटक ( क्रमांक ४९ ) काढून तेथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित. - उड्डाणपुलाची रुंदी १४ मीटर.
- दोन्ही बाजूंच्या रस्त्याची रुंदी १०.५० मीटर तर एकूण लांबी ५५० मीटर.
- उड्डाणपुलाच्या ठिकाणी छोटा भुयारी मार्गाचीही व्यवस्था.
- राज्य शासन व रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम.
- दोन्ही विभाग प्रत्येकी पन्नास टक्के खर्च करणार.

उड्डाणपूल, भुयारी मार्गाची गरज कशासाठी ?
- रेल्वे फाटकाच्या पलीकडील सांगवी गाव आणि वडगाव शहराचा केशवनगरचा भाग.
- गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण. अनेक गृहप्रकल्पांचीही निर्मिती.
- नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडून ये-जा करणे भाग.
- रेल्वे गाड्यांची संख्या अधिक असल्याने बहुतांशी वेळा फाटक बंद.
- फाटक उघडण्यासाठी नागरिकांना मोठी प्रतीक्षा, प्रसंगी रुग्ण दगावण्याचा धोका.
- उड्डाणपूल गरजेचा असल्याची रेल्वे फाटका पलीकडील नागरिकांची मागणी.
- सांगवीसह, राजपुरी, बेलज आदी आंदर मावळातील गावे ही पुलाने जोडली जाणार.
- रेल्वे पलीकडच्या भागाच्या विकासाला आणखी चालना मिळणार.
- बाधित शेतकऱ्यांचे समाधान होणेही गरजेचे.

नियोजित उड्डाणपूल मध्यवस्तीतून नेण्याचे नियोजन केल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या वडगाव विकास आराखड्यातही काही जणांची जमीन जात आहे. त्यामुळे, उड्डाणपुलाच्या कामाला तीव्र विरोध आहे. एखाद्याच्या घरादाराची राखरांगोळी न करता उड्डाणपुलाची जागा बदलावी.
- ज्ञानेश्वर ढोरे, बाधित शेतकरी.

उड्डाणपुलाच्या कामात रेल्वेच्या अलीकडे असणाऱ्या गावठाण विभागातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे होणार आहेत. त्यामुळे, सर्वच बाधित शेतकऱ्यांचा
या उड्डाणपुलाला विरोध आहे. त्यामुळे, शासनाने या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा व तो रद्द करावा.
- अविनाश चव्हाण, माजी उपसरपंच, वडगाव.
VDM24B07347, VDM24B07346

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com