मावळ विधानसभेत ५०.५२ टक्के मतदान

मावळ विधानसभेत ५०.५२ टक्के मतदान

वडगाव मावळ, ता. १३ : लोकसभा निवडणुकीसाठी मावळ विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता.१३) उत्साहात मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत ३७.५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात अधिक उत्साहाचे वातावरण होते. कडक उन्हामुळे दुपारच्या सत्रात बहुतांशी मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५०.५२ टक्के इतके मतदान नोंदविण्यात आले.
मावळ लोकसभा मतदारसंघात ३९० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ३४ उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर तीन मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच लढत होत असल्याने या दोन्ही आघाड्यांच्यावतीने बहुतेक गावांमध्ये बुथ उभारण्यात आले होते. तेथे कार्यकर्त्यांची गर्दी होती. बुथवर कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्र शोधून देण्यासाठी मदत करत होते. मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

- तालुक्याचे मुख्य ठिकाण वडगावात कार्यकर्त्यांत उत्साह
- मतदान केंद्र परिसरातील दुकाने बंद.
- केंद्राच्या शंभर मीटर अंतरामध्ये वाहने, मोबाईल नेण्यास प्रतिबंध.
- मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
- दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व्यवस्था होती.
- पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या गावांमध्ये पोलिसांचा जादा बंदोबस्त.
- पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा. ही केंद्रे नियंत्रण कक्षाशी थेट जोडली.
- मतदान केंद्रांच्या बाहेर सेल्फी पॉइंटची व्यवस्था
- मतदार उत्साहाने सेल्फी काढताना दिसून आले.

मतदान संथगतीने
सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत अतिशय कमी म्हणजे ३.४१ टक्के मतदारांनी मतदान केले होते. नंतर मात्र मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले. ११ वाजेपर्यंत १४.७५ टक्के तर दुपारी एक वाजेपर्यंत २८.३० टक्के मतदारांनी मतदान केले होते. दुपारच्या सत्रात कडक उन्हामुळे मतदानाचा वेग पुन्हा मंदावला. बहुतांशी मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. राजकीय पक्षांनी उभारलेले बूथही ओस पडलेले दिसून आले.

दुपारी तीनपर्यंत १ लाख ४० हजार जणांचे मतदान
मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण १ लाख ९१ हजार ७०२ पुरुष मतदारांपैकी ८० हजार ३११ पुरुषांनी तर एकूण १ लाख ८१ हजार ६९३ महिला मतदारांपैकी ६९ घर ७१८ महिला व १३ तृतीयपंथी मतदारांपैकी एका तृतीय पंथी मतदाराने अशा एकूण ३ लाख ७३ हजार ४०८ मतदारांपैकी १ लाख ४० हजार ३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

निरीक्षक शिवकुमार यांची पाहणी
मावळ विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक शिवकुमार यांनी अनेक मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सर्व मतदान केंद्रांशी समन्वय ठेवून मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडली. दरम्यान, ९० टक्के मतदारांना मतदान केंद्राच्या चिठ्ठ्या वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असला तरी अनेक मतदारांना त्या न मिळाल्याने केंद्र शोधण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागली.

विशेष मतदान केंद्रांची व्यवस्था
वडगाव येथील रमेशकुमार सहानी स्कूलमधील १७४ क्रमांकाचे मतदान केंद्र हे युवा संचालित मतदान केंद्र म्हणून सुशोभित करण्यात आले होते. जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र हे महिला मतदान केंद्र म्हणून सुशोभित करण्यात आले होते. येथे महिलांनी एक सारख्या गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून मोठ्या उत्साहात आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

गडकिल्ल्यांचा मावळ
कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ‘गड किल्ल्यांचा मावळ’ या संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. मावळ मतदार संघ हा गडकिल्ल्यांचा मतदारसंघ असून नागरिकांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी प्रथमच ही संकल्पना राबविण्यात आली. नागरिकांनी या संकल्पनेचे कौतुक केले.

खंडाळ्यातील वृद्धाश्रमात मतदान केंद्र
लोणावळ्यातील ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूल येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. ते उत्तमरित्या सजविण्यात आले होते. नवमतदार यांनी देखील उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. खंडाळा येथील दृष्टिहिनांच्या वृद्धाश्रमामध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी सोयी सुविधा पुरविण्यात आल्या.

लोणावळ्यात पावसाने तारांबळ
लोणावळा परिसरात सकाळच्या सत्रात मतदारांचा निरुत्साह दिसून आला. मात्र नऊ ते एक वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढला. ग्रामीण भागात कार्ला, वेहेरगाव, मळवली, भाजे, पाटण, बोरज, वाकसई, देवघर परिसरात मतदान शांततेत मात्र संथगतीने सुरू होते. त्यातुलनेत लोणावळ्यातील ॲड. भोंडे हायस्कूल, व्हीपीएस, शाळा क्रमांक एक, गवळीवाडा शाळा येथील केंद्रावर मतदानासाठी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास लोणावळा परिसरात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. त्यामुळे, मतदारांची काही काळ तारांबळ उडाली. काही ठिकाणी निवारा नसल्याने बंदोबस्तावर असलेले कर्मचारी, मतदारांची गैरसोय झाली.

मळवलीत यंत्रांत बिघाड
मळवली येथे मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाला. यंत्रे बदलून मतदानास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ पहावयास मिळाला. काहींची नावे वगळली गेली. काहींची मतदान केंद्रे बदलल्याने गैरसोय झाली. त्यामुळे, मतदारांनी नाराजी व्यक्त केली. संध्याकाळच्या सत्रात मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या.

ऊर्सेत कडक उन्हामध्ये मतदान
पवन मावळातील गावातील मतदान केंद्रांवर सकाळच्या वेळेस फारशी गर्दी जाणवली नाही. सकाळी अकरानंतर मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. दुपारी बारानंतर दुपटीने प्रमाण वाढले.
मोबाईल बंदी असल्याने मतदारांनी आपले मोबाईल कुठे मित्रांजवळ तर कुठे दुकानांमध्ये ठेवावे लागले. दुपारचे कडक ऊन असताना देखील वयस्कर मंडळींपासून तरुणांपर्यंत अनेक जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

इंदोरीत भयंकर उकाडा, वादळाचीही हजेरी
इंदोरीतील सहा मतदान केंद्रांवर सकाळी ११ पर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. भयंकर उकाड्यामुळे मतदार घराबाहेर न पडल्याने मतदानाचा वेग मंदावला. दुपारी चारनंतर वादळ झाल्याने कार्यकर्त्यांत नाराजी निर्माण झाली; मात्र, उत्साह दांडगा राहिला. मतदान बाकी असलेल्या मतदारांना वाहनांतून केंद्रांपर्यंत आणण्याची धडपड दिसली.

सोमाटणेत मतदान केंद्रांची अदलाबदल
चौराईनगरमधील काही मतदारांची नावे गावातील यादीत तर गावातील काही मतदारांची नावे चौराईनगरमधील मतदार यादीत आल्याचा प्रकार झाला. सोमाटणे गाव आणि चौराईनगर या दोन्ही विभागांत दोन किलोमीटरचे अंतर असून मतदानासाठी मतदारांना भर उन्हात धावपळ करत हे अंतर पार करावे लागले. या त्रासाला कंटाळून काही मतदारांनी आपले घर गाठल्याचा प्रकारही घडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com