मावळ विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला...

मावळ विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला...

वडगाव मावळ, ता. १४ ः निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार मावळ विधानसभा मतदार संघात एकूण ५५.४२ टक्के मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी ६.८६ टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. दुपारी कडक ऊन व सायंकाळी वादळी वारे व पावसामुळे काही गावातील मतदानावर परिणाम झाल्याने मतदानाची टक्केवारी काहीशी घसरली आहे. मात्र, वाढीव मतदानामुळे एकूण मतदान हे जवळपास गेल्या वेळी एवढेच झाले आहे.

मावळ विधानसभा मतदार संघात एकूण एक लाख ९१ हजार ७०२ पुरुष मतदारांपैकी एक लाख चौदा हजार २७१ पुरुषांनी, एकूण एक लाख ८१ हजार ६९३ महिला मतदारांपैकी ९२ हजार ६७७ महिलांनी व तेरा तृतीय पंथी मतदारांपैकी एकाने अशा एकूण तीन लाख ७३ हजार ४०८ मतदारांपैकी दोन लाख सहा हजार ९४९ (५५.४२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मावळ विधानसभा मतदार संघात सोमवारी (ता.१३) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात केवळ ३. ४१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडले. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे २८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर कडक उन्हामुळे मतदानाचा वेग पुन्हा मंदावला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लोणावळा-खंडाळा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया विस्कळित झाली.

रात्री उशीरापर्यंत मतदान...
पाऊस थांबल्यानंतर मतदार पुन्हा घराबाहेर पडले व सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. लोणावळा येथे रात्री साडे आठ वाजेपर्यंत तर देहूरोड शहरातील काही केंद्रांवरही उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर होण्यास विलंब झाला. २०१९ मध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. मात्र, वाढीव मतदारांची संख्या लक्षात घेता एकूण मतदान हे गेल्या वेळी एवढेच म्हणजे सुमारे दोन लाख दहा हजारांच्या घरात झाले आहे.

२०१९ मधील मतदानाचे आकडे...
२०१९ मध्ये एक लाख पंधरा हजार ९२६ पुरुष व ९५ हजार ४५७ महिला अशा एकूण दोन लाख अकरा हजार ३८३ (६२.२८ टक्के) मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी ६.८६ टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. मात्र, गेल्या वेळच्या तुलनेत ३५ हजार ७५१ मतदार यावेळी वाढले आहेत. वाढीव मतदारांची संख्या लक्षात घेता एकूण मतदान हे जवळपास गेल्या वेळी एवढेच झाले आहे. ते केवळ चार हजार ४३४ ने कमी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com