सर्व शाळा डिजिटल होणार; ५० मॉडेल शाळांचे उद्दिष्ट

सर्व शाळा डिजिटल होणार; ५० मॉडेल शाळांचे उद्दिष्ट

ज्ञानेश्वर वाघमारे ः सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता.३ : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शालेय पोषण आहारा बरोबरच मिष्ठान्नाने स्वागत, प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक संचाचे वाटप, भौतिक सुविधा व गुणवत्ता विषयक उपक्रमांद्वारे ५० मॉडेल शाळा तयार करणे, आणखी नवीन ५० शाळांना आयएसओ मानांकन मिळवून देणे आणि सर्व शाळा डिजीटल करण्यासारखे विविध उपक्रम व कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतले आहेत.
येत्या १५ जूनपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २७२ शाळा असून त्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे सुमारे १८ हजार ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांतून सुमारे आठशे शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकविण्यासाठी तसेच मराठी शाळांमधील गुणवत्ता वाढवून पालकांना या शाळांकडे आकृष्ट करण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याच अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके
- पहिल्याच दिवशी सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक संचाचे वाटप
- पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश
- मागणीनुसार १ लाख ४० हजार २९५ पुस्तके प्राप्त
- मंगळवार (ता.४) पासून ७ जूनपर्यंत पुस्तक संच शाळांना वितरित होणार

विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत
इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी अनोखे स्वागत करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराबरोबरच गोड खाद्यपदार्थ (मिष्ठान्न) देण्यात येणार आहे.

गुणवत्तावाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न
- नवीन वर्षात शिष्यवृत्ती परीक्षा व गुणवत्ता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न.
- प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा; यादिवशी विद्यार्थ्यांच्या आवडीचे विविध उपक्रम.
- पाढे पाठांतर, श्रुतलेखन, एक तास वाचनाचा आदी विशेष उपक्रम होणार.
- तालुक्यातील शंभर टक्के शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट.
- विविध प्रशिक्षणे, विविध स्पर्धांद्वारे शिक्षकांचे सक्षमीकरण.
- प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण, निवडक शाळांत डिकोडिंग

येत्या वर्षात १०० पेक्षा जास्त शाळा आयएसओ
प्रत्येक शाळेने वर्षभरात राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची नोंद ठेवून त्यांचे पीपीटी सादरीकरण केले जाणार आहे. तालुक्यातील पन्नास शाळांमध्ये विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून तसेच गुणवत्ता वाढीचे उपक्रम राबवून त्या मॉडेल स्कूल म्हणून तयार करण्यात येणार आहेत. सध्या तालुक्यातील ५० शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात शंभरपेक्षा जास्त शाळा आयएसओ करण्याचे ध्येय शिक्षण विभागाने ठेवले आहे.

गेल्या काही वर्षांत सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तालुक्यातील अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. गुणवत्ता वाढीसाठीही अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे, पालकांनी भरमसाट शुल्काच्या इंग्रजी शाळांचा हव्यास सोडून आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवावे. अनेक नावाजलेले अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊनच पुढे गेले आहेत.
- सुदाम वाळुंज, गट शिक्षणाधिकारी, मावळ पंचायत समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com