पीक विमा योजनेला मुदतवाढ
वडगाव मावळ, ता. २ : राज्य शासनाने पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी १४ ऑगस्ट तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे.
खरीप हंगाम २०२५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून, या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ अशी होती. तथापि गतवर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतकऱ्यांकडे ॲग्रोस्टॅक फार्मर आयडी नसणे, पीएमएफबीवाय पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार व सीएससी सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमी अभिलेख पोर्टलच्या तांत्रिक सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर परिणाम झाला आहे. तो लक्षात घेऊन केंद्र शासनाने या योजनेला मुदतवाढ दिली आहे. शासन निर्देशानुसार योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी १४ ऑगस्ट २०२५ व कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढीस मान्यता दिली आहे. या मुदतवाढीचा लाभ घेऊन मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे.
---