मूलभूत सुविधांचीच वानवा
वडगाव मावळ, ता. १२ : मावळ तालुक्यात नऊ रेल्वे स्थानके असून, दररोज सुमारे ५० हजार प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करीत असतात. मात्र, त्या मानाने मूलभूत सुविधांची मात्र वानवा आहे. पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था व निवारा शेडची अपुरी व्यवस्था, स्वच्छता गृहांची वानवा, भिकारी, जुगारी व मटक्या वाल्यांचा वावर अशी स्थिती निदर्शनास येत आहे. देहूरोड, तळेगाव व लोणावळा वगळता इतर स्थानकांवर सुरक्षा बल अथवा लोहमार्ग पोलिस नसल्याने या स्थानकांची ‘सुरक्षा राम भरोसे’ अवस्थेत आहे.
मावळ तालुक्यात देहूरोड, बेगडेवाडी, घोरावाडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली व लोणावळा अशी नऊ रेल्वे स्थानके आहेत. तालुक्यातील बहुतांशी खासगी व शासकीय चाकरमानी, व्यापारी, दुग्ध व्यावसायिक, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी हे पिंपरी चिंचवड तसेच पुण्यात येण्या जाण्यासाठी रेल्वे सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, लोणावळा, तळेगाव व देहूरोड ही स्थानके वगळता इतर स्थानकांवर मूलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर वानवा आहे. विशेषतः: पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत. स्वच्छतेचा अभाव आहे. चार वर्षांपूर्वी काही स्थानकातील फलाटांची लांबी वाढविण्यात आली. त्यांचा वापरही सुरू झाला आहे मात्र या विस्तारित फलाटांवर निवारा शेड, पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्यासाठी बाकडी, पादचारी पूल आदी सुविधा अद्याप बाकी आहेत. त्यामुळे प्रवाशांना उन्हा पावसात ताटकळत उभे राहावे लागते. पादचारी पूल नसल्याने लोहमार्ग ओलांडून ये-जा करावी लागते. वडगाव रेल्वे स्थानकावर पुणे ते लोणावळा बाजूकडे जुन्या फलाटांवर लोकल गाडीचे पायदान व फलाट यांच्यातील अंतर जास्त असल्यामुळे वृद्ध, महिला, लहान मुले यांना गाडीत बसताना व उतरताना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा खाली पडण्याची व दुखापत होण्याची भीती असते. वर्षानुवर्षे असलेल्या या तांत्रिक त्रुटीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. लोणावळा, तळेगाव व देहूरोड ही स्थानके वगळता इतर स्थानकांवर सुरक्षा बल अथवा लोहमार्ग पोलिस नसल्याने भिकारी व मद्यपींचा कायम वावर असतो. काही स्थानके जुगार व मटक्याचे अड्डे बनले आहेत. सीसीटीव्हीही नसल्याने प्रवाशांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था आहे.