मावळात पाऊसच पाऊस, धरणे काठोकाठ

मावळात पाऊसच पाऊस, धरणे काठोकाठ

Published on

वडगाव मावळ, ता. १९ : मावळ तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक तीव्रतेने पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच धरणे शंभर टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ओढे-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, हा पाऊस भात उत्पादनासाठी उपयुक्त असून सोयाबीन आणि भुईमुगासाठी हानिकारक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पावसाचा जोर मंगळवार सायंकाळपर्यंत कायम होता.
सततच्या पावसामुळे पवना, वडिवळे धरणांतून पाणी विसर्ग करण्यात येत असून नदीकाठच्या नागरीकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासह आंद्रा, जाधववाडी ही धरणे यापूर्वीच क्षमतेएवढी भरल्याने यापूर्वीच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पवना धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी सकाळी सहाही दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच जलविद्युत निर्मिती केंद्रातूनही विसर्ग केला जात आहे.
नाणे मावळातील वडिवळे धरणही १०० टक्के भरले असून, धरणातून २ हजार ७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. आंदर मावळातील आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून ४६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी जास्त होत आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी नदी काठच्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. पावसाने कोठेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी दाखल नसल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख व नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिली.

अन्य पिकांच्या नुकसानीची भीती
मावळ तालुक्यात यंदा सुमारे १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. काही भागात भात लागवड झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. सद्यस्थितीत तेथे पावसाची गरज होती. त्यामुळे सध्या पडत असलेला पाऊस भातासाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी दिली. तर, सोयाबीन व भुईमुगाच्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्यास तसेच भाजीपाला, फुलशेतीसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतचा पाऊस (मिलिमीटर)
लोणावळा-१४२
कार्ला-१०३
काले कॉलनी- ५५
शिवणे-४६
खडकाळा-३९
वडगाव-२५
तळेगाव दाभाडे- २२

Marathi News Esakal
www.esakal.com