प्रत्येक विद्यार्थी निपुण होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत ः नाईकडे
वडगाव मावळ, ता. १५ : ‘विद्यार्थी गुणवत्तेला व प्रगतीला सर्वप्रथम प्राधान्य देऊन प्रत्येक विद्यार्थी निपुण व्हावा यासाठी सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत,’ असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी केले.
पुणे जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व मावळ पंचायत समितीच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ‘निपुण कार्यशाळा’ शिरगाव येथील बी. के. बिर्ला सेंटरमध्ये घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, डाएटचे अधिव्याख्याता विकास गरड, मावळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, बी. के. बिर्ला सेंटरचे प्राचार्य चव्हाण, गहुंजेचे सरपंच कुलदीप बोडके, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप काळे, निर्मला काळे आदींच्या हस्ते झाले. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, सर्व केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच निपुण मित्र शिक्षक उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी नाईकडे म्हणाले, ‘‘प्रत्येक विद्यार्थी निपुण व्हावा यासाठी सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. शिक्षकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम ठेवावी व या सर्वांचा लाभ शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना द्यावा. विविध स्पर्धा परीक्षांचा पाया असणाऱ्या शालेय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे, यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत. कला व क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे.’’
यावेळी नाईकडे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतील ‘सायकल बँक’ या पथदर्शी प्रकल्पांतर्गत गोरगरीब ७४५ विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सायकल बँकचे उद्घाटन करण्यात आले. पुणे विभागात गटशिक्षण अधिकारी म्हणून प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांचा सत्कार त्यांनी केला. तालुक्यातील कुसगाव केंद्रातील विविध उपक्रमांनी युक्त पी.पी.टी. यावेळी दाखवण्यात आली. रूपाली शेळके यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करत निपुण भारत अभियानाची पार्श्वभूमी व सद्यःस्थिती विषद केली. केंद्रप्रमुख सुहास धस यांनी शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण या अंतर्गत पी.पी.टी.चे प्रेझेंटेशन केले. गटशिक्षण अधिकारी वाळुंज यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख सांगितला. प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, सहशालेय उपक्रम, सायकल बँक उपक्रम, दत्तक शाळा, शाळा हितासाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य, आनंददायी शनिवार व निपुण उपक्रमाचा आढावा घेतला. केंद्र प्रमुख मुकुंद तनपुरे व पुष्पा घोडके यांनी सूत्रसंचालन केले. दारुंब्रे केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक मिसाळ व केंद्रातील सर्व शिक्षकवृंदाने संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.