आयुष्यातील प्राथमिकता ठरवून तरुणांनी मार्गक्रमण करावे
वडगाव मावळ, ता. २८ : एकविसाव्या शतकात टिकून राहण्यासाठी व जगाच्या बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तरुणांनी आपल्या आयुष्यातील प्राथमिकता ठरवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे. सेल्फ मार्केटिंग करून स्वतः ब्रँड बनावे, असे आवाहन लेखक व व्याख्याते डॉ. सुनील धनगर यांनी केले.
नवरात्रीनिमित्त येथील मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माउली दाभाडे होते. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुनील मुथा, एकनाथराव टिळे, बबनराव भोंगाडे, मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, या वर्षीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष अजित देशपांडे, उपाध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, धनश्री भोंडवे, आरती राऊत आदी उपस्थित होते.
‘युवकांसमोरील आधुनिक काळातील आव्हाने’ या विषयावर बोलताना डॉ. धनगर म्हणाले की, तरुणांनी गुण आणि गुणवत्ता या विचार चक्रामध्ये अडकू नये. यश मिळवण्यासाठी प्रथम आपल्या आत काय आहे हे कळावे लागते. शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. पुस्तक हे मस्तक संपन्न करते व जग त्याच्यापुढे नतमस्तक होते. ज्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे, त्याच्यावर सरस्वती प्रसन्न होईलच असे नाही. पण ज्याच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. समाजाचा व देशाचा विकास व्हावा असे वाटत असल्यास सर्वात प्रथम आधी स्वतःला प्रगल्भ करा. तुमच्या आयुष्यात तुमचे दोनच खरे आदर्श असतात एक आई व दुसरे वडील. हे दोन आदर्श तुमच्यासमोर असतील तर तुम्ही काहीही करू शकता. पैशाच्या भौतिक सुखाच्या मागे लागू नका. बजेट बघून खर्च करा. तुमचा स्टेट्स सिम्बॉल हा तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. तुम्ही कोणत्या सोसायटीत राहता याच्यावर अवलंबून नसतो. भौतिक सुख म्हणजे सर्व नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृत्रिमच असणार आहे. ती आपल्या बुद्धिमत्तेची बरोबरी करू शकत नाही. कोणत्याही नवीन गोष्टीचा योग्य वापर केला पाहिजे.
यावेळी ॲड. शंकरराव ढोरे यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अजित देशपांडे यांनी स्वागत केले. वनश्री जोगळेकर यांनी मानपत्र वाचन केले. अतुल म्हाळसकर यांनी सूत्रसंचालन केले. नारायण ढोरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.