परमेश्वराने दिलेले जीवन 
सुंदरपणे जगले पाहिजे

परमेश्वराने दिलेले जीवन सुंदरपणे जगले पाहिजे

Published on

वडगाव मावळ, ता. १ : ‘‘आपल्यात जे चांगले आहे ते अधिकाधिक चांगले करायचा प्रयत्न केल्यास व जे उणे आहे त्याची वजाबाकी न करता ते सुधारायचा प्रयत्न केला तर, यश आणि अपयश या दोघांचे स्वागत तितक्याच सहजतेने करता येते. परमेश्वराने सुंदर जीवन दिले आहे ते सुंदरपणे जगले पाहिजे,’’ असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केले.
नवरात्रीनिमित्त येथील मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत आठवे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उर्वरित वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार होते. प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण बराटे, रामदास मारणे, सुहास धारणे, मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, या वर्षीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष अजित देशपांडे, उपाध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, कार्यक्रम प्रमुख धनश्री भोंडवे, आरती राऊत आदी उपस्थित होते.
‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर बोलताना वाड म्हणाल्या की, स्पर्धेमध्ये आपण हरवून गेलो आहे. परमेश्वराने आपल्याला जे उदंड दिले आहे, त्याची स्पर्धा इतरांशी करून त्याची वजाबाकी करू नका. मुळात स्पर्धेचे स्वरूप आपण अंतर्मुख करायला हवे. स्पर्धा कधीही आजुबाजूच्याशी नसते. स्पर्धा नेहमी स्वतःशी असते. शिक्षणाच्या डिग्रीपेक्षा आयुष्याच्या विद्यापीठात किती माणसं वाचायला शिकलो, आपले यश, अपयश, अपमान कसे वाचायला शिकलो हे महत्त्वाचे आहे. आपण प्रत्येकजण आपआपल्या गुणांचे राजे आहोत. गरज आहे ती नेमके गुण हेरून त्यांचा गुणाकार करण्याची आणि स्पर्धेचे स्वरूप अंतर्मुख करण्याची, कारण हे जीवन जे मिळाले आहे ते सुंदर आहे. आपले जीवन सुंदर आहे हे ज्याला कळते ते आपले जीवन खऱ्या अर्थाने आनंदाने जगतात.
सामाजिक कार्यकर्त्या सविता सुराणा, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, नासा भेटीसाठी निवड झालेली विद्यार्थिनी रुद्रा राजगुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. दीपक भालेराव यांनी मानपत्र वाचन केले. श्रेया भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी भोरे यांनी आभार मानले.
दरम्यान, व्याख्यानमालेत मंगळवारी भीमराव दराडे शास्त्री यांचे ‘भारतीय स्त्री संत परंपरा’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती गणेश ढोरे होते. प्रमुख पाहुणे समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष किरण इनामदार, ॲड. रवींद्रनाथ दाभाडे आदी उपस्थित होते. गो रक्षक शिवशंकर स्वामी, सेंद्रिय शेतीमध्ये प्रयोग करणारे शेतकरी रोहिदास लखिमले आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. सुषमा जैन यांनी मानपत्र वाचन केले. अरुण वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजीराव म्हाळसकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com