उपक्रमशील शिक्षक अजिनाथ शिंदे यांचा सत्कार
वडगाव मावळ, ता. १२ : निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक अजिनाथ शिंदे यांच्या विविध उपक्रमांची विनोबा ॲपने दखल घेत त्यांचा ‘पोस्ट ऑफ द मंथ’ हा पुरस्कार देऊन गौरव केला. त्यानिमित्त मावळ पंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे यांच्या हस्ते शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, संदीप काळे, निर्मला काळे, भगवंत बनकर, सुनंदा दहितुले, केंद्रप्रमुख बाळासाहेब घारे, मुकुंद तनपुरे, रामचंद्र भांगरे, अजित मोरे आदी उपस्थित होते. अजिनाथ शिंदे हे निगडे येथील शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची व वृक्ष संवर्धनाची सवय रुजावी यासाठी शाळा परिसरात दरवर्षी पन्नासहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. तसेच त्यांचे संगोपनही केले आहे. गणेशोत्सव काळात त्यांनी विद्यार्थ्यांकडून गणपतीच्या विविध मूर्ती बनवून घेत विद्यार्थ्यांमध्ये कार्यानुभवाची आवड निर्माण व्हावी यासाठी घेतलेल्या कृतीयुक्त उपक्रमास ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार प्राप्त झाला.