भांबावलेले इच्छुक व सैरभर कार्यकर्ते
वडगाव मावळ, ता. १५ : वैचारिक भूमिका घेण्यास गोंधळलेले नेते, पदाधिकाऱ्यांची होत असलेली फरफट, भांबावलेले इच्छुक व सैरभर अवस्थेतील कार्यकर्ते अशी अवस्था सध्या वडगाव, तळेगाव दाभाडे व लोणावळा येथील निवडणुकीच्या निमित्ताने मावळच्या राजकीय वातावरणात दिसून येत आहे.
राज्य पातळीवर पक्षांच्या विचारधारेला (आयडियॉलॉजी) बाजूला ठेवून तीन पक्षांची महायुती झाली व कायम एकमेकाशी लढणारे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेली ही युती गाव पातळीपर्यंत स्वीकृत होऊ शकली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. मावळ तालुक्यात सध्या लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी भरण्यास १० तारखेपासून सुरुवात झाली व आता अवघे दोन दिवस बाकी आहेत. मात्र एकीकडे युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ तर दुसरीकडे उमेदवारीसाठी पक्षातच असलेली तीव्र स्पर्धा यामुळे एकही राजकीय पक्ष सर्व जागांवरील उमेदवार अद्याप घोषित करू शकला नाही. तालुक्यात प्रबळ असलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीत युती करण्यावरून तू-तू मै-मै’ सुरू असून सहकार्यापेक्षा एकमेकांत कुरघोडी करण्याचा वासच त्यात अधिक येत आहे.
अडीच वर्षांनी पद हस्तांतरित कसे करणार
हे पक्ष युती करताना नगराध्यक्षपद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याचा बोलबाला करतात. मात्र, हे पद थेट जनतेमधून निवडले जाणार असल्याने ते मध्येच दुसऱ्याकडे हस्तांतरित कसे करणार हा मुख्य प्रश्न आहे. किंबहुना ही प्रक्रिया सोपी नसेल. नगराध्यक्षपद नगरसेवकांच्या बहुमतातून निवडायचे असते तर ते मध्येच दुसऱ्याकडे हस्तांतरित करणे सहज शक्य होते. मात्र, ते जनतेमधून असल्याने पहिल्याने राजीनामा दिल्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणूक घ्यावी लागेल व ही प्रक्रिया राबविणे सर्वस्वी निवडणूक आयोगावर अवलंबून राहील. पुन्हा निवडणूक कधी घ्यायची त्याची काल मर्यादाही आयोगावरच अवलंबून असेल. दुसरीकडे नगरसेवक पदाच्या जागा वाटप हाही कळीचा मुद्दा आहे. तीन ते चार वर्षांपर्यंत निवडणूक लांबल्यामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. या कालावधीत अनेकांनी मोठे खर्च केले आहेत. त्यामुळे अनेक जण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच अशा मनःस्थितीत आहे. दुसरीकडे मावळच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादी हे दोनच पक्ष प्रमुख प्रतिस्पर्धी राहिले असल्याने त्यांचे सूत जुळणे अवघड झाले आहे. युतीचा निर्णय त्यांच्या गळी उतरवणे सहजासहजी शक्य नाही. त्यामुळे एकमेकाविरोधात पूर्ण तयारीत उतरलेल्या इच्छुकांना थांबविणे नेत्यांसाठी अवघड होऊन बसले आहे. इकडे आड, तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे भूमिका ठरविण्यात त्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे या गोंधळात पदाधिकाऱ्यांची फरफट होताना दिसत आहे तर इच्छुक भांबावलेल्या अवस्थेत आहेत. कधी नव्हे एवढी मावळच्या राजकीय वातावरणात अशी स्थिती झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

