एकल महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला प्रतिसाद

एकल महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला प्रतिसाद

Published on

वडगाव मावळ, ता. १६ : पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समितीच्या वतीने कान्हे येथे आयोजित एकल महिला आरोग्य शिबिराला प्रतिसाद मिळाला. सुमारे सातशे महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. महिलांनी शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करावे असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केले.
एकल महिलांना सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्याच्या उद्देशाने कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात हा अभिनव उपक्रम पार पडला. शिबिराचे उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झाले. शिबिरात महिलांनी आत्मविकास, स्वावलंबन आणि सरकारी योजनांची माहिती घेतली. या वेळी महिलांना कॅन्सर तपासणी, रक्तदाब, हिमोग्लोबिन, साखर, बीएमआय तपासणी तसेच आरोग्य सल्ला देण्यात आला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, स्वयंरोजगार संधी, आरोग्य आणि सुरक्षा याबाबत माहिती देण्यात आली. या प्रसंगी आत्मरक्षा, मानसिक आरोग्य आणि उद्योजकतेवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत अधिकारी संतोष शिंदे व कर्मचारी, महसुल अधिकारी प्रतिभा वाघोले, धनराज गिरम, तालुका आरोग्य अधिकारी वामनराव गेंगजे, विस्तार अधिकारी डी.डी. ठोंबरे, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आदींनी नियोजन केले. सहभागी महिलांना मार्गदर्शन करून माहितीपत्रके वितरित करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com