वडगावमध्ये ४९ जण निवडणुकीच्या रिंगणात

वडगावमध्ये ४९ जण निवडणुकीच्या रिंगणात

Published on

वडगाव नगर पंचायत निवडणूक
-----------------------
भाजप, राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका

१७ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात; नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारात सामना

वडगाव मावळ, ता. २१ : वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ४५ असे ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली. दरम्यान, नाराजांना शांत करण्यात अपयश आल्याने भाजपला एका तर राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल सहा प्रभागात बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. नऊ प्रभागांमध्ये दोन उमेदवारांमध्ये सरळ सामना होणार असून, पाच प्रभागांत तिरंगी तर तीन प्रभागांत चौरंगी लढत होणार आहे. एका प्रभागात राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने भाजपच्याच दोन उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे.

वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ६४ जणांचे अर्ज वैध ठरले होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात नगराध्यक्ष पदाच्या एका व नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेल्या १९ जणांनी माघार घेतली. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या काही इच्छुकांनी पक्षाचा आदेश नसताना अर्ज दाखल केले होते. ते मागे घेण्यासाठी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यात भाजपला काही प्रमाणात यश आले. प्रभाग नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही. तेथे भाजपला बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याने भाजपच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये अखेरपर्यंत समेट न झाल्याने त्यांनी एकमेकांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहे. ते मागे घेण्यात अपयश आल्यामुळे या पक्षाला तब्बल सहा प्रभागात बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. त्यात प्रभाग दोन, तीन, पाच, सात, अकरा, बारा या प्रभागांचा समावेश आहे. नऊ माजी नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षासह प्रत्येकी १७, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक लढवत आहे. २६ तारखेला चिन्ह वाटप होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात राहिलेले उमेदवार पुढील प्रमाणे :
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार (सर्वसाधारण महिला)- मृणाल गुलाबराव म्हाळसकर (भाजप), अबोली मयूर ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस), वैशाली पवन उदागे (वंचित बहुजन आघाडी), नाजमाबी अल्ताफ शेख (अपक्ष).
नगरसेवक पदाचे उमेदवार
- प्रभाग क्रमांक १ (अनु.जमाती महिला): पूनम विकी भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी भोरू हिले (शिवसेना)
- प्रभाग २ (नागरिकांचा मागास प्रवर्ग): दिनेश गोविंद ढोरे (भाजप), प्रवीण विठ्ठल ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस), दत्तात्रेय सीताराम पिंपळे (अपक्ष), पंढरीनाथ राजाराम ढोरे (अपक्ष)
- प्रभाग ३ (सर्वसाधारण) : भाऊसाहेब तुकाराम ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस), रोहित मंगेश धडवले (भाजप), राहुल अनंतराव नखाते (शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे), अर्पण चंद्रकांत ढोरे (अपक्ष)
- प्रभाग ४ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) : पूजा अतिश ढोरे (भाजप), सुनीता राहुल ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग ५ (सर्वसाधारण महिला) : वैशाली पंढरीनाथ ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी योगेश म्हाळसकर (भाजप), रूपाली अतुल ढोरे (अपक्ष)
- प्रभाग ६ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) : मयूर प्रकाश ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस), विशाल वसंतराव वहिले (भाजप)
- प्रभाग ७ (अनुसूचित जाती) : दीपक नारायण भालेराव (भाजप), अजय महेंद्र भवार (राष्ट्रवादी काँग्रेस), चंद्रजित दिनकर वाघमारे (अपक्ष)
- प्रभाग ८ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) : माया अमर चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), वैशाली रमेश म्हाळसकर (भाजप)
- प्रभाग ९ (सर्वसाधारण महिला) : सुप्रिया प्रवीण चव्हाण(भाजप), सारिका प्रशांत चव्हाण (अपक्ष)
- प्रभाग १० (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) : सुजाता गणेश भेगडे (भाजप), आकांक्षा योगेश वाघवले(राष्ट्रवादी काँग्रेस)
- प्रभाग ११ (सर्वसाधारण) : किरण रघुनाथ म्हाळसकर (भाजप), सुनील गणेश ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस), पंढरीनाथ राजाराम ढोरे (अपक्ष), यशवंत निवृत्ती शिंदे (अपक्ष)
- प्रभाग १२ (सर्वसाधारण) : राजेंद्र हनुमंत म्हाळसकर (भाजप), गणेश सोपान म्हाळसकर (राष्ट्रवादी काँग्रेस), अतुल खंडू वायकर (अपक्ष)
- प्रभाग १३ (सर्वसाधारण) : विनायक रामदास भेगडे (भाजप), अजय बाळासाहेब म्हाळसकर (राष्ट्रवादी काँग्रेस), गणेश दत्तात्रेय भांगरे (अपक्ष)
- प्रभाग १४ (अनु. जाती महिला) : वैशाली गौतम सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस), दीपाली शरद मोरे(भाजप)
- प्रभाग १५ (सर्वसाधारण) : राजेंद्र विठ्ठलराव कुडे (राष्ट्रवादी काँग्रेस), अनंता बाळासाहेब कुडे (भाजप)
- प्रभाग १६ (सर्वसाधारण महिला) : राणी संतोष म्हाळसकर (भाजप), मीनाक्षी गणेश ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस), सायली रूपेश म्हाळसकर(अपक्ष)
- प्रभाग १७ (सर्वसाधारण महिला) : अर्चना संतोष म्हाळसकर (भाजप), अर्चना ज्ञानेश्वर ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस).

Marathi News Esakal
www.esakal.com