वडगावच्या निकालाविषयी उत्सुकता

वडगावच्या निकालाविषयी उत्सुकता

Published on

वडगाव मावळ, ता. १९ : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाविषयी मोठी उत्सुकता आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर ही दुसरी निवडणूक आहे. मतमोजणी रविवारी (ता. २१) होणार आहे.
पहिल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. दुसऱ्या निवडणुकीत या पदावर कमळ फुलणार की घड्याळाचा गजर होणार याबाबत संपूर्ण मावळ तालुक्यातील मतदारांना उत्सुकता आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये वडगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली होती. थेट जनतेमधून निवडल्या गेलेल्या नगराध्यक्षपदासाठी चुरशीची तिरंगी लढत झाली होती. त्यात अपक्ष उमेदवार मयूर ढोरे यांनी बाजी मारली होती. नगरसेवक पदाच्या १७ जागांवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला संमिश्र यश मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक आठ, भाजपला सात, मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक असे बलाबल आहे.

उत्स्फूर्त मतदान
निवडणूकीसाठी दोन डिसेंबर रोजी उत्स्फूर्तपणे ७३.३३ टक्के मतदान झाले. १९ हजार ८४७ मतदारांपैकी ७ हजार ३२१ पुरुष आणि ७ हजार २३२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगराध्यक्षपदासाठी चार, तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ४५ असे एकूण ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षासह प्रत्येकी १७, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात होता.
चार प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाली होती, मात्र बहुतेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात थेट सामना होता. या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच मार्गांचा अवलंब केला. विशेषतः: ‘मनी फॅक्टर’ची मोठी चर्चा झाली. त्यामुळेच निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
सर्वाधिक चर्चा नगराध्यक्षपदाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अबोली ढोरे, भाजपच्या ॲड. मृणाल म्हाळसकर, वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली उदागे व अपक्ष उमेदवार नाजमाबी शेख अशा चौघी जणी रिंगणात होत्या. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे कुणाची सरशी होणार याची चर्चा सुरू आहे. त्यातच निकाल लांबल्यामुळे गेल्या पंधरा दिवसात उमेदवारांनी सर्व बाजूंनी आकडेमोड करून विजयाचे ठोकताळे बांधले आहेत. दोन्ही बाजूंचे समर्थक ठामपणे विजयाचा दावा करत आहेत. आता घोडा मैदान जवळ आल्याने त्यांच्या दाव्यातील तथ्य लवकरच स्पष्ट होणार आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com