गडकिल्ले, लेण्यांचे पावित्र्य जपण्यासाठी 
आवश्यक उपाययोजना कराव्यात

गडकिल्ले, लेण्यांचे पावित्र्य जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात

Published on

वडगाव मावळ, ता. २३ : नववर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबरला पर्यटकांकडून तिकोना, तुंग, लोहगड, विसापूर, मोरगिरी आदी दुर्ग तसेच ऐतिहासिक लेण्यांचे पावित्र्य जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वडगाव येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेने वनविभाग व पोलिस खात्याकडे केली आहे. संस्थेने याबाबत वडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी व लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
वडगाव वनपरिक्षेत्रात तिकोना, तुंग, लोहगड, विसापूर व मोरगिरी आदी गडकिल्ले तसेच ऐतिहासिक लेणी येत आहेत. गडकिल्ल्यांवर ३१ डिसेंबर साजरा करताना अनेक तरुण-तरुणी नववर्षाचे स्वागत हे मद्यपान, धूम्रपान व इतर अमली पदार्थाचे सेवन करून करतात. मोठमोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावून धांगडधिंगा व हुल्लडबाजी केली जाते. त्यामुळे गडकिल्ले व लेण्यांच्या पावित्र्यास धक्का लागतो. गेल्या काही वर्षांत ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काही पर्यटक हे गडकिल्ल्यांचा तसेच लेणी व जंगल परिसराचा गैरवापर करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील तिकोना, तुंग, लोहगड, विसापूर व मोरगिरी तसेच ऐतिहासिक लेणी व जंगल परिसर या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करावा. ३१ डिसेंबरला रात्री वरील ठिकाणी कोणी गैरकृत्य करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गरज भासल्यास योग्य ते प्रतिबंधात्मक आदेश प्रसारित करण्यात यावेत. जेणेकरून गडकिल्ल्यांचे व ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपले जाईल व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत.
---

Marathi News Esakal
www.esakal.com