‘पुणे ग्रँड टूर’ची प्रशासकीय तयारी पूर्ण, मावळी पद्धतीने स्वागत
वडगाव मावळ, ता. १८ : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मावळ तालुक्यात स्पर्धेतील खेळाडूंचे मावळी पद्धतीने ढोल-लेझीमच्या निनादात स्वागत केले जाणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २०) सकाळी आठ ते सायंकाळी सहा यावेळेत स्पर्धा मार्गावरील दैनंदिन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेचा मावळ तालुक्यातील टप्पा २० जानेवारी रोजी पार पडणार आहे. मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्या नजीकच्या जवन या गावापासून तिकोना पेठ, ब्राम्हणोली, काले, कडधे, थुगाव, शिवणे, डोणे, सावळे चौक, आढले बुद्रुक, बेबडओहळ, चंदनवाडी, चांदखेड, कासारसाई असा सुमारे ३५ किलोमीटर अंतराचा मार्ग आहे.
पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख म्हणाले,‘‘सायकल स्पर्धा मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, विभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील लोणावळा ग्रामीण, कामशेत व वडगाव मावळ पोलिस ठाण्यांचा कर्मचारी वर्ग बंदोबस्तावर असेल. प्रत्येक शंभर मीटर अंतरावर एक पोलिस व होमगार्ड उभा असेल. स्पर्धा मार्गात कोणतीही व्यक्ती अथवा जनावरे येऊ नयेत व अडथळा निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिस घेतील. वर्दळीच्या चौकात जादा पोलिस बंदोबस्त असेल. ठिकठिकाणी पोलिस मदत केंद्रांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.’’
गेल्या तीन महिन्यांपासून मावळ तालुक्यात स्पर्धेची तयारी सुरू आहे. स्पर्धेच्या मार्गांतील आठ रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण व उच्च प्रतीचे डांबरीकरण करण्यात आले असून रस्त्यावरील मार्किंग, साइन बोर्ड लावण्याचे कामही पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सोमवारी रस्त्याची साफसफाई करण्यात येईल.
- धनराज दराडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
कशी आहे तयारी ?
- सायकल स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना.
- स्पर्धा मार्गांतील प्रत्येक गावात प्रशासकीय कर्मचारी व स्वयंसेवकांची नेमणूक.
- ग्रामस्थांच्या सहभागातून प्रत्येक गावात रांगोळ्या काढण्यात येणार.
- शालेय विद्यार्थी दुतर्फा उभे राहून सायकलपटूंचे स्वागत करणार.
- तत्पूर्वी ढोल-लेझीम पथकासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून वातावरण निर्मिती होणार
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे : १) मौजे चावसर, जोवन क्र. २ जोवन क्र. ३ इत्यादी गावांकडून येणारी वाहने मुंबई व पुणे बाजूकडे जाण्यासाठी जोवन क्र. १ येथे न येता खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येतील. पर्यायी मार्ग : मौजे जोवन क्र. २ व जोवन क्र. ३ चावसर इत्यादी गावांतील वाहने मौजे तुंगी फाटा मार्गे लोणावळा अशी वळविण्यात येणार.
२) मौजे आंबेगाव, शिंदगाव इत्यादी गावांकडून येणारी वाहने ही काले फाटा येथे येण्यास बंदी आहे. पर्यायी मार्ग : मौजे आंबेगाव, शिंदगाव इत्यादी गावांतील वाहने दुधिवरे मार्गे औंढे-औंढोली पुढे लोणावळा येथे वळविण्यात येणार.
कामशेत पोलिस ठाणे ः कडधे गाव हे हिंजवडी, पुणे, पवनानगर, पौडकडे जाणारे मुख्य जंक्शन असल्याने सायकल स्पर्धे दिवशी कामशेत ते पवनानगर पौड अशी जाणारी वाहतूक सायकल स्पर्धा संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
१) कामशेत कि.मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना, पवना चौक, कामशेत ते पवनानगर, पौड अशी पवनानगर मार्गाकडे जाणारी वाहतूक सायकल स्पर्धेच्या दिवशी जुन्या पुणे-मुंबई महामार्ग (एन एच ४८) कामशेत कि. मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक या ठिकाणी पूर्णपणे बंद केली जाईल. पवनानगर, पौड, आर्डव, शिवणे, महागांव, शिरगांवकडे जाणारा कामशेतकडून एकच मार्ग असून
पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे या दिवशी कामशेत ते पवनानगर, पौडकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे.
वडगाव मावळ पोलिस ठाणे ः १) शिरगाव, परंदवडीकडून येणारी वाहतूक बेबडओहोळ मार्गे शिवणे, शिवली बाजूकडे न पाठवता सदरची जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने वळविण्यात येईल.
२) चांदखेडकडून डोणे बाजूकडे येणारी वाहतूक चांदखेड इथे स्पर्धा संपेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार.
३) कामशेत मार्गे थुगांवकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने मौजे कामशेत येथेही स्पर्धा संपेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
४) मळवंडी ढोरे, येळघोल, शिवली गावांकडून आर्डव बाजूकडे येणारी वाहतूक भडवली गावच्या अलीकडील चौकात येलघोल फाटा येथे सायकल स्पर्धा पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
या सायकल स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी होणार असल्याने मावळचे नाव जागतिक पातळीवर जाणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडावी यासाठी गावोगावी जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला आहे. स्पर्धा मार्गातील गावांतील ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
- विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

