मावळात मतदानाची तयारी पूर्ण

मावळात मतदानाची तयारी पूर्ण

Published on

वडगाव मावळ, ता.५ : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शनिवारी (ता. ७) होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली.
मतदानासाठी ईव्हीएम (इलेक्टॉनिक व्होटिंग मशिन) चा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटचा समावेश असणार आहे. मतदानाची पूर्व तयारी म्हणून मतदानासाठी आवश्यक पुरेशी मतदान यंत्रे तसेच राखीव मतदान यंत्रे तयार करून त्यांचे सीलिंग करण्यात आले आहे. मतदान यंत्रे योग्य असल्याबाबत पडताळणीही करण्यात आली आहे. शुक्रवारी मतदानासाठी नियुक्त पथकांना मतदान यंत्रे हाताळणी व इतर साहित्याबाबत प्रात्यक्षिक घेऊन सर्व साहित्य दुपारपर्यंत त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे व पोलिस बंदोबस्तासह त्यांची रवानगी संबंधित मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहे.

तालुक्यात २४३ मतदान केंद्रे
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच व पंचायत समितीचे दहा मतदार संघ आहेत. या मतदारसंघांसाठी २४३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर चार मतदान अधिकारी, एक शिपाई व एक पोलिस कर्मचारी या प्रमाणे एकूण एक हजार ४५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. मतदानाची वेळ शनिवारी (ता. ७) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी असून, मतदारांनी मतदानाला जाताना सोबत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. ते नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आदी बारापैकी एक ओळखीचा पुरावा नेणे गरजेचे आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. मतमोजणी सोमवारी (ता. ९) वडगाव येथे होणार आहे.

एकाच बॅलेट युनिटवर दोन मतपत्रिका
मावळ तालुक्यात एकूण दोन लाख ३१६ मतदार आहेत. यामध्ये एक लाख दोन हजार ८२ पुरुष मतदार, ९८ हजार २२६ महिला मतदार आणि आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. एकाच बॅलेट युनिटवर (मतदान यंत्रावर) वरच्या बाजूला जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची पांढऱ्या रंगाची तर खालच्या बाजूला पंचायत समितीच्या उमेदवारांची गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे. बॅलेट युनिटवरील यादीतील जिल्हा परिषद पदाचे उमेदवार व पंचायत समिती पदाचे उमेदवार या दोन्ही यादीतील प्रत्येकी एका उमेदवारासमोरील बटन दाबल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

नागरिकांनी योगदान द्यावे
निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट करण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.

जिल्हा परिषद गट मतदार संख्या
- टाकवे बुद्रुक-नाणे गट ः ३९,५४७
- इंदुरी- वराळे गट ः ३६,२८०
- खडकाळे-कार्ला गट ः ३९,१०३
- कुसगाव बुद्रुक-काले गट ः ३९,६११
- सोमाटणे-चांदखेड गट ः ४५,७७५

पंचायत समिती गण मतदार संख्या
- टाकवे बुद्रुक ः १९,८३९
- नाणे ः १९,७०८
- वराळे ः १९,७८१
- इंदुरी ः १६,४९९
- खडकाळे - २०,४२९
- कार्ला ः १८,६७४

- कुसगाव बुद्रुक ः १५,४१२
- काले ः २४,१९९
- सोमाटणे ः २,८११
- चांदखेड ः २२,९६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com