भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादीकडून परिवर्तन ?
वडगाव मावळ, ता. ८ : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी (ता. ९) वडगाव येथे होत आहे. तालुक्यात उत्स्फूर्तपणे झालेल्या मतदानाचा फायदा कोणत्या पक्षाला होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. मावळ पंचायत समितीवर प्रदीर्घ काळ असणारी सत्ता भाजप राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन करण्यात यशस्वी होणार, याचा फैसला दुपारपर्यंत होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी शनिवारी अतिशय उत्साहाच्या वातावरणात ७७.२५ टक्के मतदान झाले. रात्री उशिरा मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार एक लाख दोन हजार ८२ पुरुष मतदारांपैकी ७९ हजार ७९३ जणांनी, तर ९८ हजार २२६ महिला मतदारांपैकी ७४ हजार ९४५ अशा दोन लाख ३१६ मतदारांपैकी एक लाख ५४ हजार ७४० (७७.२५ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण पुरुष मतदारांपैकी ७८.१६ टक्के तर एकूण महिला मतदारांपैकी ७६.२९ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानात पुरुषांचा टक्का (५१.५६ टक्के) जास्त असून नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का (४८.४३ टक्के) काहीसा घसरल्याचे दिसून आले.
चुरशीच्या ठिकाणी उत्स्फूर्त मतदान
चुरशीच्या मतदारसंघांत उत्स्फूर्तपणे मतदान झाल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदार संघांपैकी इंदुरी- वराळे गटात सर्वाधिक ८०.५४ टक्के, तर टाकवे बुद्रूक-नाणे गटात सर्वात कमी ७५.३२ टक्के मतदान झाले. पंचायत समितीच्या दहा मतदार संघांपैकी वराळे गणात सर्वाधिक ८२.०९ टक्के तर नाणे गणात सर्वात कमी ७१.२६ टक्के मतदान झाले. चुरशीने लढल्या गेलेल्या इंदोरी वराळे, खडकाळे कार्ला, कुसगाव बुद्रूक काले या जिल्हा परिषद गटात तसेच वराळे, काले, चांदखेड, टाकवे बुद्रूक, इंदोरी, कार्ला या पंचायत समिती गणांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले.
जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व ४० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झालेले आहे. बहुतांश जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवारांमध्ये प्रामुख्याने सामना होता. आता या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार याबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता आहे. पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजप पंचायत समितीवरील सत्ता कायम राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस ती खेचून घेणार याचा फैसला सोमवारी दुपार पर्यंत होणार आहे.
जिल्हा परिषद
मतदारसंघ ः पुरुष ः महिला ः एकूण ः टक्केवारी
टाकवे बुद्रूक-नाणे ः १५८०७ ः १३९७९ ः २९७८६ ः ७५.३२
इंदुरी-वराळे ः १४८६५ ः १४३५४ ः २९२२० ः ८०.५४
खडकाळे-कार्ल ः १५२३६ ः १४५४९ ः २९७८६ ः ७६.१७
कुसगाव बुद्रूक-काले ः १५९२९ ः १५०९५ ः ३१०२४ ः ७८.३२
सोमाटणे-चांदखेड ः १७९५६ ः १६९६८ ः ३४९२४ ः ७६.२९
पंचायत समिती
मतदारसंघ ः पुरुष ः महिला ः एकूण ः टक्केवारी
टाकवे बुद्रूक ः ८२११ ः ७५३२ ः १५७४३ ः ७९.३५
नाणे ः ७५९६ ः ६४४७ ः १४०४३ ः ७१.२६
वराळे ः ८३१५ ः ७९२२ ः १६२३८ ः ८२.०९
इंदुरी ः ६५५० ः ६४३२ ः १२९८२ ः ७८.६८
खडकाळे ः ७८४३ ः ७५४९ ः १५३९३ ः ७५.३५
कार्ला ः ७३९३ ः ७००० ः १४३९३ ः ७७.०८
कुसगाव बुद्रूक ः ५८९८ ः ५६९३, ११५९१ ः ७५.२१
काले ः १००३१ ः ९४०२ ः १९४३३ ः ८०.३०
सोमाटणे ः ८४६८ ः ७८६१ ः १६३२९ ः ७१.५८
चांदखेड ः ९४८८ ः ९१०७ ः १८५९५ ः ८०.९७
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

