विरोधी पक्षांवर अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ

विरोधी पक्षांवर अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ
Published on

वडगाव मावळ, ता. १० : मावळ तालुक्यात नगर परिषदांच्या निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मिळविलेल्या एकतर्फी विजयामुळे तालुक्यातील भाजपसह अन्य पक्षांवर अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे.
मावळात गेल्या पाच सहा वर्षांपासून आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची घौडदौड सुरू आहे. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन विजय प्राप्त केल्यानंतर पक्ष संघटनेवर ताबा मिळवला व पक्षातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ती मजबूत केली. त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या कार्यकाळात देहू नगरपंचायतीची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. सर्व विरोधक एकवटले असताना एक लाखाहून अधिक मताधिक्याने त्यांनी विजयश्री मिळवली. आता त्यांच्या या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रथमच झाल्या. तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत महायुती करून त्यांनी आपल्या पसंतीच्या नगराध्यक्षासह पक्षाचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणले. वडगाव व लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षासह या दोन्ही शहरात पक्षाने बहुमत प्राप्त केले व आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तर पक्षाच्या विजयाचा वारू अधिकच उधळला. जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्वच्या सर्व पंधरा जागांवर एकतर्फी विजय मिळवत या पक्षाने भाजपसह अन्य पक्षांना व्हाइट वॉश दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने हा विजय मिळवून प्रथमच पंचायत समितीवर पक्षाचा झेंडा फडकावला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व १५, भाजपने १४, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र काँग्रेस पक्षाने तीन, काँग्रेसने दोन तर शिवसेना व वंचित बहुजन आघाडीने एका जागेवर उमेदवार दिला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेने एकही जागा लढवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्हीकडे सुमारे ६० टक्के मते मिळवून सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. विरोधी पक्षांना ४० टक्के मते मिळूनही एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.
विशेष म्हणजे एकेकाळी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह तालुक्यात सर्वदूर सत्ता असलेल्या भाजपला एकही जागा मिळाली नाही. पूर्वी या पक्षाकडे उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असायची. आता उमेदवार शोधायची वेळ आली आहे. काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षांनाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार देता येत नाहीत. विरोधी पक्षांची झालेली ही दारुण अवस्था व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू असलेली विजयी घौडदौड लक्षात घेता या पक्षांवर अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे. आता लवकरच तालुक्यातील १०३ पैकी सुमारे ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. विरोधी पक्षांना या गावपातळीवरील सत्ता केंद्रापासून नव्याने सुरुवात करून आपल्या पक्षाचा पाया भक्कम करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उधळलेल्या या विजयी वारुला रोखण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

जिल्हा परिषदेसाठी मतदानाची आकडेवारी
पक्ष ः मतदान (टक्केवारी)
- राष्ट्रवादी कॉंग्रेस ः ९४, ६३८ (६१ टक्के)
- भाजप ः ५५, ८८६ (३६ टक्के)
- इतर पक्षांसह नोटा ः १,८१५ (तीन टक्के)

पंचायत समितीसाठी मतदानाची आकडेवारी
- राष्ट्रवादी काँग्रेस ः ९२, ७९५ (६० टक्के)
- भाजप ः ५३, ८२४ (सुमारे ३५ टक्के)
- इतर पक्षांसह नोटा ः ८,१०९ (पाच टक्के)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com