वडगाव रेल्वे स्थानकावर सुविधा रखडल्या

वडगाव रेल्वे स्थानकावर सुविधा रखडल्या

Published on

वडगाव मावळ, ता. ११ : वडगाव रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या विस्तारित फलाटांवर निवारा शेड, बसण्यासाठी बाक, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधांची कामे रखडली आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम आहे. आता उन्हाळा सुरू होत असल्यामुळे या सुविधा रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर सज्ज कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
पुणे-लोणावळा दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकलला होणारी गर्दी पाहता सुविधांअभावी प्रवाशांचे हाल वाढत आहेत. डब्यांची संख्या व लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाने अनेक वर्षांपासून केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने डब्यांची संख्या वाढविण्याआधी फलाटाची लांबी वाढविली. हे काम जानेवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आले. सात आठ महिन्यांत ते पूर्णही करण्यात आले. दोन्ही बाजूंना नऊ मीटर रुंद व २०५ मीटर लांब असे फलाट वाढविण्यात आले आहेत. वर्षभरापासून तेथे लोकल थांबण्यासही सुरवात झाली आहे. मात्र दोन्ही फलाटांवर प्रवाशांसाठी असलेली मूलभूत सुविधांची कामे अजूनही रखडली आहेत.
मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव मावळ रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे अडीच ते तीन हजार प्रवासी लोकलने ये-जा करत असतात. शासकीय व खासगी कर्मचारी व कामगार वर्ग, व्यापारी, दुग्ध व्यावसायिक, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला अशा सर्वांनाच लोकल उपयोगाची आहे. त्यातून रेल्वेलाही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. त्यामुळे विस्तारित फलाटांवर किमान सुविधा मिळाव्यात, इतकीच प्रवाशांची अपेक्षा आहे.
दरम्यान, या रेल्वे स्थानकावर पुणे ते लोणावळा बाजूकडे जुन्या फलाटांवर लोकलचा फुटरेस्ट व फलाट यांच्यातील अंतर जास्त आहे. त्यामुळे वृद्ध, महिला, लहान मुले यांना गाडीत बसताना व उतरताना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा प्रवासी खाली पडण्याची व दुखापत होण्याची भीती असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही तांत्रिक त्रुटी असूनही त्यात सुधारणा झालेली नाही.
फलाटावर एकाच ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे. बहुतांशी प्रवासी पूर्वेकडील बाजूने ये जा करतात. एका बाजूला केशवनगर व दुसऱ्या बाजूला वडगाव गावठाण आहे. प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पादचारी पूल, शौचालय तसेच आणखी एका तिकीट घराची गरज आहे.

प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा
प्रवाशांच्या सोयीसाठी विस्तारित फलाटांवर निवारा शेड, बसण्यासाठी बाके आदी मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावावीत, असे पत्र येथील स्टेशन प्रमुखांनी देहूरोड येथील वरिष्ठ विभागीय अभियंत्यांना अनेकदा पाठवले आहे, मात्र कामे कूर्मगतीने सुरू आहेत.
---
वाढविलेल्या फलाटांवर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हात पावसात आणि उन्हातही तसेच उभे राहावे लागते. काही प्रवासी जुन्या फलाटांवर असलेल्या निवारा शेडमध्ये थांबतात, पण लोकल येताच त्यांना पळापळ करावी लागते. या धावपळीत अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे निवारा शेडचे काम लवकर व्हावे.
- सुधाकर गुरव, प्रवासी

वडगावसह आजूबाजूच्या गावातील नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने लोकलने ये जा करतात. त्या मानाने सुविधांची मात्र कमतरता आहे. विशेषत: वाढविलेल्या फलाटांवर निवारा शेड, बाके व शौचालयाची सुविधा तातडीने होण्याची गरज आहे.
- निवृत्ती शिंदे, प्रवासी
-----
फोटो
11406

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com