वडगावला १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

वडगावला १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत
Published on

वडगाव मावळ, ता.६ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार १२ सप्टेंबरला जिल्हा व सत्र न्यायालय, वडगाव मावळ येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा जलद, कमी खर्चात आणि सामंजस्याने निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विविध प्रकारच्या तडजोडयोग्य प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये वीज व पाणी बिलांची देयके, बँक कर्ज वसुलीची प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक वाद, मालमत्ता विवाद, कर्मचारी नुकसान भरपाईची प्रकरणे तसेच तडजोडयोग्य दिवाणी व फौजदारी स्वरूपातील प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात येणार आहे.
लोक अदालतीत प्रकरण निकाली निघाल्यास संबंधित पक्षकारांना न्यायालयीन शुल्क परत मिळण्याची कायदेशीर तरतूद असून, कमी खर्च, कमी वेळेत आणि परस्पर सामंजस्यातून न्याय मिळण्याचा लाभही मिळतो. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ आणि खर्चाची बचत होऊन दोन्ही पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण तोडगा निघण्यास मदत होते.
ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवावयाची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयाशी किंवा वडगाव मावळ विधी सेवा समितीशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घेऊन आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


व्हिडिओ कॉन्फरसिंगची सोय
लोकअदालतीस प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पक्षकारांसाठी दृकश्राव्य (व्हिडिओ कॉन्फरसिंग) प्रणालीद्वारे सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरगावी असलेल्या किंवा इतर कारणांमुळे न्यायालयात उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांनाही या लोकअदालतीचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com