स्वः आरोग्य सुढृडतेसह वृक्षांचे संवर्धन अन् संगोपन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वः आरोग्य सुढृडतेसह वृक्षांचे संवर्धन अन् संगोपन
स्वः आरोग्य सुढृडतेसह वृक्षांचे संवर्धन अन् संगोपन

स्वः आरोग्य सुढृडतेसह वृक्षांचे संवर्धन अन् संगोपन

sakal_logo
By

हिंजवडी, ता. ७ : वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरें, पक्षी ही सुस्वरे आळवती! या तुकोबारायांच्या महान पंक्ती हिंजवडीतील तरुणांनी सार्थ ठरविल्या आहेत. व्यायाम करणे स्वतःच्या आरोग्यासाठी उत्तमच बाब आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या आयटीतील तरुणांनी आरोग्याबरोबर झाडांची आणि पर्यावरणाची जोपासनेची गरज ओळखून येथील म्हातोबा टेकडीवर वनराई फुलविण्याचा संकल्प केला आहे.
हिंजवडीतील विविध आयटी कंपन्या त्यांच्या सीएसआर निधीतून ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाच्या टेकडीवर वृक्षारोपण उपक्रम राबवतात. शेकडो झाडे लावून फोटोसेशन होते. एक छानसा इव्हेंट होतो. मात्र वृक्ष संगोपनाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाहीत. आठवड्यात ती झाडे पाणी व देखभाली अभावी जळून जातात. ही बाब श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या सदस्यांनी अचूक हेरली. शरीराच्या सुढृडतेसह वृक्ष जतन व संवर्धनाची जबाबदारी त्यांनी घेतली. तसेच झाडांना पुनर्जीवन देण्याचा निर्धार झाला.
सुरुवातीला दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना पाण्याची बाटली सोबत नेऊन झाडांना पाणी घालण्यास सुरुवात झाली. परंतु टाकलेले पाणी लगेच झिरपून जाऊ लागले. त्यामुळे काठी, प्लास्टिक पाइप घेऊन त्याला पाण्याची वेस्टेज बाटली बांधून त्याद्‍वारे ठिबक सिंचन करण्याची कल्पना त्यांना सुचली. आता या बाटलीत दररोज पाणी टाकले जाते. थेंब-थेंब पाणी झाडांना दिवसभर मिळते यातून सुमारे शंभरहून अधिक विविध फळे, फुले, व औषधी, पर्यावरणपूरक झाडे टेकडीवर बहरली आहेत. तर या पाण्याने पशू पक्षांच्या पिण्याच्या पाण्याचीही उत्तम सोय झाली आहे.

हिंजवडी ग्रामपंचायत मदतीला
सकाळी पाण्याचे कॅन, खते अन औषधे आदींची जमवाजमव करून सदस्यांची टेकडीवर जाण्याची लगबग सुरू होते. वरती पोचताच सर्व झाडांना पाणी व गरजेनुसार खते, औषधे दिली जातात. उत्तम निगा राखल्याने आता येथे आंबा, चिंच, डाळिंब, जांभूळ, बांबू, आवळा यासह काही औषधी, पर्यावरण पूरक ऑक्सिजन देणारी झाडे आता चांगलीच बहरली आहेत. हे पाहून आता ग्रामपंचायत देखील या तरूणांच्या मदतीला धावून आली आहे कर्मचाऱ्यांनी आळे करून नुकतेच या झाडांना कुंपण घातले आहे.

पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपण काळाची गरज आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावलेच पाहिजे मात्र केवळ वृक्षरोपण न करता संगोपन देखील महत्त्वाचे आहे. आमच्या छोट्याशा प्रयत्नातून एक जरी झाडला जीवदान मिळाले तरी आपले कार्य सफल होईल या भावनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ व श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रेकर्स ग्रुपच्या सर्व सदस्यांनी श्री म्हातोबा देवाच्या टेकडीवरील झाडांचे संगोपन करायचे ठरवले त्यानुसार आम्ही झाडांची निगा राखत आहोत.
- अरुण साखरे
सदस्य