
मानवी दूध बँकेला प्रोत्साहनाची गरज अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे मत
वाकड, ता. १६ : बहुतेक आजारी नवजात शिशूंना पहिल्या आठवड्यात आईचे दूध मिळत नसल्याने मानवी दूध बँका त्यांच्यासाठी वरदान ठरत आहेत. त्यामुळे या बालकांमधील कर्करोगासह अन्य आजार रोखणे शक्य होते. त्याशिवाय मातांचे अंडाशय आणि स्तनाच्या कर्करोगापासूनही संरक्षण होते. त्यामुळे देशाची भावी पिढी बौद्धिक, मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम घडण्यासाठी मानवी दूध बँकेला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी वाकड येथे केले.
स्तनपान न करू शकणाऱ्या माता आणि नवजात अर्भकांना चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी सूर्या हॉस्पिटलने वाकडमधील सुविधेत ‘स्ह्युमन मिल्क बँक’ सुरू केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते या सुविधेचे नुकतेच उदघाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. निओनॅटोलॉजी अॅड पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर सर्व्हिसेसचे संचालक डॉ. सचिन शहा, डॉ. मनिषा खलाने उपस्थित होत्या.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या, ‘‘मानवी दूध बँक सुरू करण्यासाठी सूर्याने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे.’’
डॉ. सचिन शहा म्हणाले, ‘‘आमचे नवजात अर्भक युनिट दरवर्षी सुमारे सातशे नवजात बाळांना सेवा पुरवते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, स्तनपानात वाढ केल्याने दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त बालकांचे प्राण वाचू शकतात.’’
फोटोः 03117