थेरगावात सांभर प्रजातीची शिंगे, कवटी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगावात सांभर प्रजातीची शिंगे, कवटी जप्त
थेरगावात सांभर प्रजातीची शिंगे, कवटी जप्त

थेरगावात सांभर प्रजातीची शिंगे, कवटी जप्त

sakal_logo
By

हिंजवडी, ता. ३१ : घरातील हॉलमध्ये अथवा बंगल्यांच्या बैठक खोलीत, दर्शनी भागात शोभेची वस्तू अथवा बडेजाव म्हणून काहींना काही इंपोर्टेड वस्तू, जंगली प्राण्यांची शिंगे, दाते, हाडे, कातडे, सांगाडा, मुखवटे लावण्याची हौस असते. मात्र, हाच हव्यास आपल्याला किती भारी पडू शकतो याची प्रचिती थेरगावातील एका उद्योजकावर आली. त्याने घरात सांभर प्रजातीच्या प्राण्याची शिंगे व तोंडाचा सांगाडा लावल्याने मुळशी वनविभागाने त्याच्या घरावर छापा मारत कारवाई केली.

मुळशीच्या वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार थेरगावातील शिव कॉलनी, लेन नं. २बी मधील सुरेश अप्पा नाईक यांच्या धनश्री बंगलोवर मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच घोटावडे येथील वनपाल यांच्यासह वनविभागाच्या पथकाने धाड मारून झडती घेतली असता सांभर प्रजातीच्या वन्यप्राण्याची शिंगे तोंडाच्या सांगाड्यासह आढळून आली. प्रथमदर्शनी सदर शिंगे लाकडापासून तसेच पीओपी असून घरामध्ये शोपीस म्हणून बनवलेली लावलेली असा आभास निर्माण करण्यात आला. परंतु, सांगाडा ताब्यात घेऊन तपासणी केली असता सदरची शिंगे ही सांभर प्राण्याचीच असल्याचे आढळून आले. आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सदर शिंगे २० वर्षांपासून घरामध्ये असल्याचे मान्य केल्याने आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ३९, ५०, ५१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मुळशी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल घोटावडे प्रज्ञा बनसोडे, वनरक्षक पांडुरंग कोपनर, संतोष मुंडे व कर्मचाऱ्यांनी केली.

‘‘वन्यजीवांची शिकार करणे, तस्करी करणे किंवा वन्यजीवांचे अवशेष जवळ बाळगणे हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा असून सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही होऊ शकतात. अशा घटना निदर्शनास आल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा अथवा वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ वर कळवावे.
- संतोष चव्हाण (वनपरिक्षेत्र अधिकारी, पौड)