शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिव भक्तांच्या टेम्पोला अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिव भक्तांच्या टेम्पोला अपघात
शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिव भक्तांच्या टेम्पोला अपघात

शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिव भक्तांच्या टेम्पोला अपघात

sakal_logo
By

शिवज्योत घेऊन जाणाऱ्या
तरुणांच्या टेम्पोला अपघात

ताथवडे येथील घटना, ३३ जण जखमी


हिंजवडी, ता. १० : शिवजयंतीनिमित्त मल्हारगडहून (ता. पुरंदर) मावळ तालुक्यातील शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांच्या टेम्पोला ट्रकने मागून धडक दिल्याने ३३ जण जखमी झाले. ही घटना कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील ताथवडे येथे शुक्रवारी (ता. १०) पहाटे साडे चारच्या सुमारास घडली. दरम्यान, ट्रकचालकाला तत्काळ अटक करण्यासाठी तरुणांनी महामार्ग रोखून धरल्याने महामार्गावर चार तास वाहतूक कोंडी झाली.
याबाबत टेम्पो चालक सागर भागू कोंडभर (रा. शिलाटणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक नामदेव विनायक पाटोळे (वय ३६) व क्लीनर प्रशांत विकास बनसोडे (वय २६, दोघेही रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून, क्लीनर बनसोडे याला ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींवर सोमाटणे फाटा येथील दोन व रावेत येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी, मल्हारगडाहून शिवज्योत नेत असताना काही तरुण टेम्पोत, काही टेम्पोच्या मागे- पुढे तर काहीजण
दुचाकीवर लोणावळ्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, ताथवडे येथे ट्रकने (क्र. एमएच ४८, बीएम ११९२) मागून टेम्पोला जोरदार धडक दिली. यात टेम्पोतील तरुण जखमी झाले. दरम्यान, टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील पायी जाणाऱ्या व दुचाकीवरील तरुणांना टेम्पोची धडक बसली.
अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रकचालकाला तत्काळ अटक करावी व जखमींवर उपचार करून, त्यांना भरपाई द्यावी या मागणीसाठी तरुणांनी मुंबई-बंगळूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे रावेत ते बालेवाडीपर्यंत महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी तरुणांची समजूत काढत जखमींना रुग्णालयात हलविले. अखेर आठच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त मनोजकुमार लोहिया, उपायुक्त काकासाहेब डोळे यांनीही भेट देऊन पाहणी केली. या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी व नोकरदार, कामगारांना बसला. परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरत पायी शाळा गाठावी लागली

-------------------
शिलाटणेसह परिसरातील कार्यक्रम रद्द
शिलाटणे गावासह परिसरात शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, मर्दानी खेळ, सांस्कृतिक व सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पहाटेच अपघाताची बातमी समजताच सर्वांनीच केवळ शिवप्रतिमेचे पूजन करून, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे शिलाटणेचे माजी सरपंच हेमंत भानुसघरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
---------------------
जखमी तरुणांची नावे

दक्ष भानुसघरे, ऋतिक कोंडभर, संस्कार कोंडभर, गणेश कोंडभर, वेदांत कोंडभर, अथर्व कोंडभर, यश कोंडभर, अभिषेक मोरे, सिध्दार्थ भानुसघरे, रोहन भानुसघरे, वीरेन मोरे, सिद्धेश कोंडभर, साहिल पाटफोडे, करण कोंडभर, आदित्य सातकर, हर्ष धाम, गौरव भानुसघरे, तेजस कोंडभर, सौरभ कोंढभर यासह अन्य तेराजण जखमी झाले आहेत. आर्यन सोमनाथ कोंडभर व विलास पोपट कोंडभर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आहे.
फोटोः 03467