बोअरवेलने तारले, महापालिकेने छळले टँकर लॉबीने लुटले

बोअरवेलने तारले, महापालिकेने छळले टँकर लॉबीने लुटले

वाकडकरांची सात वर्षांपासून होरपळ

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड ः सुरळीत व मुबलक पाणीपुरवठ्यात महापालिका अपयशी ठरत असल्याने प्रशासनावर अवलंबून न राहता वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगावातील रहिवाशांनी बोअरवेलचा आधार घेतला आहे. मात्र, उन्हाळ्यात बोअरवेल आटतात. काहींचे पाणी कमी होते. महापालिकेचे पाणी देखील कमी दाबाने येते किंवा पाणी कपात केली जाते. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून नागरिकांची पाण्याअभावी होरपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
उन्हाळा सुरू होताच वाकड, थेरगाव, ताथवडे परिसरात पाण्याचा ठणठणाट सुरू होतो. करदात्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या चार-पाच महिन्यात टँकरच्या पाण्यावर लाखो रुपये खर्चून तहान भागवावी लागते. त्यामुळे सोसायटी फेडरेशनने ॲड. सत्या मुळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा आदेश गेल्या वर्षीच दिला आहे. तरीही ढिम्म प्रशासनाला फरक पडलेला नाही. शेवटी पुन्हा अंमलबजावणीसाठी याचिका दाखल करावी लागली. त्यावर न्यायालयाने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती सहा महिन्यापूर्वी नियुक्त केली होती. सर्वत्र पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा आदेश दिला. समितीकडे अनेक तक्रारी आल्या, तरीही संघर्ष संपलेला नाही. न्यायालयाचा आदेश असताना ऐन पावसाळ्यात महापालिका प्रशासनाने काय केले? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. पावसाळ्यातही पाणीपुरवठा अपुराच असतो. केवळ भूगर्भातील पाणीसाठा साठवून बोअरवेलद्वारे उपसा करून तहान भागवली जाते. त्यावेळी ‘मुबलक पाणीपुरवठा’ असल्याचे श्रेय महापालिका घेते, अशा संतप्त भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.

‘‘सोसायट्यांना उन्हाळ्यात किंवा अन्य कोणत्याही मोसमात पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये, म्हणून पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटीज् फेडरेशन गेल्या आठ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. आम्ही महापालिका प्रशासनासमोर हात जोडले. सतत पत्रव्यवहार केला. बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडली. बैठकी घेतल्या. चर्चा केली, मोर्चे काढले, आंदोलने केली, पण अधिकाऱ्यांवर काहीही फरक पडलेला नाही. धरणात पाण्याचा पुरेसा साठा आहे, पण ते पाणी सोसायट्यांच्या वळचणीला पोहोचतच नाही. टँकरची लाखो रुपयांची बिले अदा केल्यावरच पाणी मिळते.
- ए. एम. देशमुख, संस्थापक व कार्यकारिणी सदस्य पिंपरी-चिंचवड को-हाउसिंग सोसायटी फेडरेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com