‘लाईफ रिपब्लिक’कडून समाजहिताची जपणूक

‘लाईफ रिपब्लिक’कडून समाजहिताची जपणूक

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
हिंजवडी, ता. ५ : पर्यावरणाचा ध्यास घेऊन वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणे, तेवढ्याच उत्साहात रूढी आणि परंपरांचे आपुलकीने जतन करणारी सोसायटी म्हणून मारूंजीच्या लाईफ रिपब्लिकने आयटीनगरीत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छंदी जीवन जगण्याबरोबर पर्यावरण संवर्धनातून सामाजिक हित जपणारी सोसायटी म्हणजे लाईफ रिपब्लिक टाऊनशिप होय.
हिंजवडी-नेरे रस्त्यावर निसर्गाच्या सानिध्यात तसेच मारुंजी, नेरे, जांबे या तीनही गावांच्या भूमीचा स्पर्श झालेल्या भूसंगमावर ही आलिशान सोसायटी ऐटीत उभी आहे. सोसायटीच्या भोवताली बड्या पंचतारांकित आयटी कंपन्यांचा गराडा आहे. सोसायटीत गगनचुंबी इमारती, प्रशस्त रस्ते, हिरवीगर्द झाडी, प्रवेश करताच मनाला प्रसन्नता देणारी आल्हाददायक शीतलता, जिकडे-तिकडे हिरवेगार गालिचे. पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट अनुभवता येतो.

३८० एकरवरील जम्बो टाऊनशिप
या टाऊनशीपमध्ये एकूण बावीस सोसायट्यांचा समावेश असून प्रत्येक सोसायटी आपले वेगळेपण टिकवून आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या सोसायटीत सर्वधर्मीय बांधव, बावीस मजली चार इमारती मिळून तब्बल १ हजार ९० सदनिकांतील सर्व सदस्य एका एकत्रित कुटुंबाप्रमाणे गुण्या-गोविंदाने राहत आहेत.

सामाजिक एकात्मतेचे प्रतीक
सर्वधर्मीय सर्व सण-उत्सव मोठ्या आनंदाने आणि एकोप्याने साजरे करतात. राष्ट्रीय सणही रहिवाशांकडून तळमळीने आणि आस्थेने साजरे केले जातात. हे एकत्रित कुटुंब म्हणजेच सामाजिक एकात्मतेचे प्रतीक बनले आहे. मकर संक्रांतीनिमित्त पतंग उत्सव, होळी, शिवजयंती, गणेशोत्सव, दिवाळी, दीपोत्सव, ख्रिसमस, ईद, बैसाखी आणि खास महिलांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. सण, उत्सव काळात अंगभूत कलागुणांना देण्यासाठी नाटक, विविध स्पर्धा, वेशभूषा, नृत्य, संगीत अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

झाड लावून वाढदिवस...
प्रत्येक सदस्यांचा आनंदी क्षण, वाढदिवस अथवा विशेष प्रसंगाची आठवण म्हणून सोसायटीच्या परिसरात सर्व सभासद एकत्र जमतात आणि सोसायटीच्या आवारात एक झाड लावत असतात. या अलिखित नियमाचे सर्वांकडून काटेकोरपणे पालन केले जाते. काहीजण वृक्ष संगोपनाची जबाबदारीही घेतात.

प्रत्येक झाडावर ‘बर्डस हाऊस’
सोसायटी आवारातील विविध फुले-फळांच्या झाडांवर फळांचा बहर असतो. खास पक्षांसाठी सभासदांकडून परिसरात हंगामी भाजीपाला आणि ज्वारी, बाजरी पेरली जाते. प्रत्येक मोठ्या झाडावर ‘बर्डस् हाऊस’ ठेवण्यात आले आहेत. निवारा आणि दाणा-पाण्याची सोय असल्याने येथे दिवसभर पक्षांचा किलबिलाट असतो. त्यामुळे, विशेषतः सायंकाळी आणि पहाटेच्या सुमारास येथील प्रसन्नता अनुभवण्याची वेगळीच गंमत आहे.

शारीरिक तंदुरुस्तीसाठी तरतूद
मुलांसाठी चिल्ड्रेन पार्क, इनडोअर गेम्स, सायकल ट्रॅक आहे. वृक्षवेलीतून गेलेला मनोहारी वॉकिंग ट्रॅक, क्लब हाऊस, योगारूम, स्पोर्ट्स रूम, स्वीमिंग पूल तसेच छोटेखानी क्रिकेट मैदान, नानानानी पार्क अशा ठिकाणी सर्व सभासद मिळून निसर्गाच्या सानिध्यात आयुष्याचा मनमुराद आनंद लुटत असतात.

आधुनिक सर्व सुख-सुविधांनी परिपूर्ण आमच्या सोसायटीत जास्त उच्चशिक्षित आणि आयटीयन्स आहेत. मात्र, सर्व सदस्य तेवढेच संवेदनशील आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. सर्वांच्या विचारांची आणि सल्ल्याची सांगड घालत एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण करून सोसायटीचे हित आम्ही साधतो.
- प्रियंका सुरवसे, रहिवासी, आर-थ्री, लाइफ रिपब्लिक टाऊनशिप

कोल्हापूर, सांगली व कोकण पूरग्रस्तांच्या मदतीला आमची टीम धावून गेली. आम्ही भरघोस मदत केली. परिसरातील गरजू नागरिक, अनाथ आश्रमांना अन्नदान, रोख मदत, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व रक्तदान शिबिर भरवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात सर्व रहिवासी अग्रेसर आहेत.
- रामदास येवले, अध्यक्ष, आर-थ्री, लाइफ रिपब्लिक टाऊनशिप


व्यस्त दिनक्रमातून सभासद एकमेकांच्या सुख-दुःखांत सहभागी होतात. कुठल्याही कुटुंबास कोणती अडचण होणार नाही किंवा समस्या उद्भवणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते किंवा एखादी समस्या उद्भवल्यास त्याचे तात्काळ निराकरण करण्यास आम्ही प्राधान्य देतो.
- श्रीराम बारसे, सचिव

सोसायटीचे पदाधिकारी व सर्व सदस्य कायम पर्यावरण व निसर्ग संवर्धनास चालना देतात. सर्वधर्मीय उत्सव आणि सण आम्ही सर्वजण एकत्रितपणे आनंदाने साजरे करतो. आमची सोसायटी म्हणजे मिनी भारताचे प्रतीकच बनली आहे.
- सौरभ तिवारी, खजिनदार
PNE24U30761, PNE24U30760,PNE24U30759,PNE24U30757

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com