वाकड, थेरगावामध्ये वाहतुकीचा रोजच गुंता
बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ३० : गेल्या काही वर्षांत थेरगाव आणि वाकड परिसर आयटीयन्स आणि रहिवासी क्षेत्र म्हणून वेगाने विकसित झाले आहे. परंतु, या विकासाबरोबरच बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली आहे. या समस्येमुळे स्थानिक रहिवासी, नोकरदार आणि व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाने समन्वय साधून त्यावर तोडगा काढावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
वाकड आणि थेरगाव परिसरात रस्त्यांवर बेशिस्तपणे आणि सर्रासपणे उभी केली जाणारी वाहने वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे. विशेषतः सकाळी ८ ते ११, दुपारी २ ते ३, सायंकाळी ५ ते ९ यावेळेत ही समस्या अधिक गंभीर बनते. त्याने रहदारीसाठी उपलब्ध जागा कमी होते आणि कोंडी निर्माण होते. वाकड, थेरगावच्या विविध चौकांत दुपारी अडीचच्या सुमारास शाळा सुटण्याच्यावेळी कोंडीचा मोठा मनस्ताप सर्वांना सहन करावा लागतो.
हॉटेल्स, मॉल्स, व्यावसायिक केंद्रांमुळेही रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढते. ग्राहक, विक्रेते रस्त्यांवरच वाहने उभी करतात. या बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांवरील जागा कमी होते. त्यामुळे झालेल्या कोंडीमुळे वाहनांचा वेग मंदावतो किंवा ती थांबून मोठ्या रांगा लागत आहेत.
कोंडीची प्रमुख कारणे
- पदपथ किंवा रस्त्याच्या मधोमधही वाहने उभी
- खासगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ
- स्मार्ट सिटीमधील रस्ते छोटे आणि पदपथ मोठे
- अर्ध्याहून अधिक रस्ता पार्किंगमुळे व्यापला
- बेशिस्त वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन
- दुहेरी पार्किंग किंवा नो-पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणे
कोंडीची प्रमुख ठिकाणे
- वाकड - पिंक सिटी रस्त्यावरील युरो स्कूल चौक
- भूमकर चौकाजवळील विनोदे कॉर्नर
- कस्पटे वस्तीतील हॉटेल ॲम्बेयन्स चौक
- मुंबई - बंगळुरू महामार्गलगत शनी मंदिर चौक
- डांगे चौक, वाकड - डांगे चौक रस्ता
कोंडीचे दुष्परिणाम
- आपत्कालीन मदत कार्यात अडथळे
- नागरिकांचा वेळ, इंधनाचा अपव्यय
- हवेच्या प्रदूषणात वाढ
- रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम
- अपघात होण्याचा धोका
उपाययोजना काय ?
- महापालिका, वाहतूक विभागाने समस्येकडे लक्ष देणे
- वाहतूक नियमांच्या कठोर अंमलबजावणी
- सुनियोजित पार्किंग व्यवस्था, बेशिस्त पार्किंगवर कारवाई
- नो-पार्किंग झोनमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई
- महापालिका प्रशासन, वाहतूक विभाग, रहिवासी यांच्यात समन्वय ठेवणे
रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी केलेली वाहने आणि अपुरी पार्किंग सुविधा यामुळे रोजच्या प्रवासात ताण येतो. काही वेळा कोंडीचा गुंता तास न तास सुटत नाही. वाहतूक पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सातत्याने कारवाईचा बडगा उगारल्यास मोठा फरक पडेल. अनावश्यक ठिकाणी मोटारीचा वापर टाळल्यास स्वतः हून वाहतूक नियमांचे पालन केल्यास कोंडीतून सर्वांची मुक्तता होईल.
- किरण वडमागा, रहिवासी, पलाश हाउसिंग सोसायटी, वाकड
वाकड, थेरगाव परिसरातील अनेक ठिकाणे कोंडीच्या ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ जाहीर करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यानुसार महापालिकेकडून सकारात्मक तयारी सुरू आहे. याशिवाय रस्त्यात बेशिस्त लावण्यात येणाऱ्या व ‘नो पार्किंग’मधील वाहनावर नियमित कारवाई केली जातेच. टोइंग करून ती उचलली जातात. ही कारवाई आणखी तीव्र केली जाईल.
- सुनील पिंजण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग
WKD25A09165, WKD25A09163, WKD25A09164
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.