देव आणि डॉक्टरांमुळे आमची लेक परत आली...

देव आणि डॉक्टरांमुळे आमची लेक परत आली...

Published on

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ५ : मारुंजीमधील शिंदे वस्ती येथील तिसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीमधून तोल जाऊन सावी (नाव बदलले आहे) ही दोन वर्षांची चिमुरडी सुमारे ४० फूट खाली पडून गंभीर जखमी झाली. मात्र, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टाळून केलेले तातडीचे उपचार व प्रयत्नानंतर ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. देव आणि डॉक्टरांमुळे आमची लेक परत आली, या शब्दांत तिच्या आईने भावना व्यक्त केली.
अपघात झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी सावीला तातडीने वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र ती अर्धवट शुद्धीत होती. तिला श्वास घेणेही कठीण झाले होते. डॉक्टरांनी तिला तत्काळ व्हेंटिलेटरवर घेतले. तिच्या डोक्याला टाके पडले. रात्रभर मेहनत घेऊन तिची प्रकृती स्थिर केली. रक्तस्राव, सूज आणि प्रचंड दाबामुळे मेंदूचे भाग एका बाजूला सरकल्याचे स्कॅनमध्ये आढळून आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला सूज येऊन तंतू फाटले होते. हे कितीही गंभीर दिसत असले तरी, संभाव्य धोका आणि स्कॅनमध्ये समोर आलेल्या बाबींवरून त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही, असा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
पाचव्या दिवशी सावीची प्रकृती थोडी स्थिर वाटत असतानाच अचानक ती (रिफ्रॅक्टरी स्टेटस एपिलेप्टिकस) अविरत झटके येण्याच्या स्थितीत गेली. ही अवस्था आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांना तिला ४८ तास बेशुद्धावस्थेत ठेवावे लागले. त्यात तिची स्थिती सुधारू लागली आणि हळूहळू ती शुद्धीत येऊ लागली. डॉक्टरांनी उपचारांची पद्धत बदलली आणि तिला गाढ झोपेत ठेवून मेंदूवरचा दाब कमी केला. हा निर्णय निर्णायक ठरला.


सावी पडली तेव्हा लगेच बेशुद्ध झाली नाही. ती थरथर कापू लागली आणि तिला उलटीही झाली. ती माझ्या हातात अक्षरश: थरथरत होती. हे दृश्य सुन्न करणारे होते. आम्ही तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. आयसीयूमधील १६ दिवस आमच्यासाठी एका युगासारखेच होते. मात्र, देव आणि डॉक्टरांमुळे आमची लेक परत आली.
- सावीची आई

अपघातातून बचावलेली अनेक लहान मुले दीर्घकालीन स्मृती, बोलण्याचे किंवा चालण्याचे त्रास अनुभवतात. मात्र, सावीच्या बाबतीत अशा कोणत्याही दीर्घकालीन गुंतागुंतीची शक्यता नाही. सावीच्या मेंदूला नैसर्गिकरीत्या बरे होण्याची संधी देण्यासाठी आम्ही औषधे, ऑक्सिजन सपोर्ट आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह केअरद्वारे स्थिर करण्यावर लक्ष केंद्रित केले. हा विचारपूर्वक घेतलेला धाडसी निर्णय होता आणि त्याचा फायदाही झाला.
- डॉ. सचिन शहा, बालरोगतज्ज्ञ, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com