ताथवडे रस्त्यावर होर्डिंगसाठी वृक्षांची कत्तल
वाकड, ता. ३१ : नव्याने विकसित होत असलेल्या ताथवडे चौक ते मुंबई - बंगळुर महामार्गा दरम्यानच्या रस्त्यावर होर्डिंगवर फ्लेक्स आणि जाहिरात बोर्ड लावण्यासाठी वृक्षांची छाटणी आणि कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे होर्डिंग व्यावसायिकांची मनमानी वाढत असल्याचा आरोप होत आहे.
होर्डिंगवरील जाहिराती दिसण्यासाठी ताथवडे रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे तोडली गेल्याचे आढळून आले आहे. झाडांच्या फांद्या, काही ठिकाणी शेंडे कापले जात असून काही ठिकाणी संपूर्ण झाडेच तोडली गेली असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. अशोकनगर परिसर, टोयोटा सर्व्हिस स्टेशन व रोहन सोसायटी परिसरात असे प्रकार घडले आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
कारवाईचा अभाव
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून या बेकायदेशीर वृक्षतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महापालिकेच्या परवानगीशिवाय अशी वृक्षतोड होऊ शकत नाही. तरीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, असे ताथवडे येथील रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून वृक्षतोडीसाठी कठोर नियम असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे संबंधित व्यावसायिकांची हिंमत वाढत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
वृक्षतोड रोखण्यासाठी महापालिकेने सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर नियम, पारदर्शक परवाना प्रक्रिया आणि नियमित तपासणी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. महापालिकेने या प्रकाराकडे तातडीने लक्ष द्यावे, दोषींवर कठोर कारवाई करावी. फ्लेक्स व होर्डिंग व्यावसायिकांना चाप लावण्यासाठी कठोर नियम लागू करावेत. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
- सचिन पवार, वृक्षमित्र
वृक्षतोड प्रकाराची घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाईल. त्यानंतर त्यासाठी परवानगी घेतली आहे का ? याची तपासणी करून परवानगी नसल्यास १९७५ शहरी वृक्ष तोड अधिनियमाप्रमाणे संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका
WKD25A09415
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.