जिवंत देखाव्यातून प्रबोधनाची परंपरा

जिवंत देखाव्यातून प्रबोधनाची परंपरा

Published on

जिवंत देखाव्यातून प्रबोधनाची परंपरा
थेरगाव परिसर

वाकड, ता. ३ : यंदा थेरगाव परिसरातील अनेक मोठ्या मंडळांनी जिवंत देखाव्यांतून सामाजिक प्रबोधनाचा संकल्प कायम ठेवला आहे. काही मंडळांनी ऐतिहासिक देखावे सादर केले आहेत. सोबतच बालजत्रा, आरोग्य शिबिरे, आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने बालगोपाळ व नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता येत आहे.

‘मरावे परी देहरुपी उरावे’
विशाल मित्रमंडळाचे हे ५३ वे वर्ष आहे. मंडळाने यंदा ‘मरावे परी देहरुपी उरावे’ हा १२ कलाकारांचा समाज प्रबोधनात्मक जिवंत देखावा सादर केला आहे. श्रींच्या अंगावरील आभूषणे सौंदर्यात भर घालत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी थेरगाव ग्रामपंचायत असताना मंडळाची स्थापना झाली होती. माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे मंडळाचे कार्याध्यक्ष, योगेश बारणे अध्यक्ष आहेत.

जिवंत देखाव्याची परंपरा कायम
थेरगावमधील सम्राट मित्र मंडळाने यंदाही जिवंत देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा ऐतिहासिक जिवंत देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. खासदार श्रीरंग बारणे हे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. माजी नगरसेवक नीलेश बारणे अध्यक्ष, तर युवा सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे हे कार्याध्यक्ष आहेत.

बालजत्रा लहानग्यांचे मुख्य आकर्षण
वनदेव आनंदवन मित्र मंडळाची दहा दिवस भरणारी बालजत्रा लहानग्यांचे मुख्य आकर्षण असते. मंडळाचे हे १९ वे वर्ष असून जग्गनाथपुरीच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे. मुंबईतील लालबागच्या राजाची आठवण करून देणारी येथील भव्य बारा फूट मूर्ती गणेशभक्तांचे श्रद्धास्थान बनली आहे. येथे दहा दिवस दररोज भाविकांना महाप्रसाद दिला जातो. माजी नगरसेवक अभिषेक बारणे हे मंडळाचे संस्थापक असून संतोष उघाडे अध्यक्ष आहेत.

कळसूत्री बाहुल्यांचे आकर्षण
गणेशनगर, थेरगाव येथील श्री मयुरेश्वर मित्रमंडळाने कळसूत्री बाहुल्यांचा खेळ हा देखावा केला आहे. मंडळाचे हे ४० वे वर्ष आहे. सुरेश पाटील अध्यक्ष आहेत.

‘मावळ्यांचा शक्ती-युक्तीचा संगम’
थेरगाव, संतोषनगर येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्रमंडळाने केलेला ‘‘खेळला जीवाशी सोंगातला शिवाजी’’ हा देखावा गर्दी खेचत आहे. दररोज किमान चार ते पाच देखावे सादर होऊनही नागरिकांची गर्दी होते आहे. कठीण काळात शिवाजी महाराज यांच्या सुटकेसाठी मावळ्यांचा शक्ती आणि युक्तीचा संगम याचे सादरीकरण अंगावर काटा आणत आहे. मंडळाचे यंदाचे ४१ वे वर्ष असून दरवर्षी विविध कल्पनात्मक देखाव्यांसह सामाजिक उपक्रम, मनोरंजन कार्यक्रम विविध शिबिरे, स्पर्धा आयोजित केले जातात. येथील गौरी-गणपती सजावट स्पर्धा नागरिकांचे प्रमुख आकर्षण असते. माजी नगरसेवक संतोष बारणे, माया बारणे, सचिन बारणे मार्गदर्शक असून, विराज बारणे अध्यक्ष आहेत.

पर्यावरण जागृतीचा प्रयत्न
लक्ष्मणनगर, थेरगांव येथील जय महाराष्ट्र मित्रमंडळाने ‘पर्यावरण ही खरी श्रीमंती’ हा जिवंत समाज प्रबोधनात्मक देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदा ४० वे वर्ष आहे. अक्षय गुजर हे अध्यक्ष आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’वर बैठा देखावा
पडवळनगर, थेरगावातील श्री शिवछत्रपती मित्रमंडळाने ३५ व्या वर्षात प्रदार्पण केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर बैठा देखावा केला आहे. शिक्षण समिती अध्यक्ष व माजी नगरसेविका मनिषा पवार आधारस्तंभ, तर शंकर खांडके अध्यक्ष आहेत.

गडकिल्ल्यांचे वैभव
लक्ष्मणनगर, थेरगांव येथील श्रीमंत शिवज्योत प्रतिष्ठानचे हे २८ वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र व गड किल्ले यांचा एचडी फोटोतील देखावा केला आहे. विक्रांत मगर हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

फुलांची सजावट लक्षवेधी
गुजरनगर थेरगाव येथील ‘गुजरनगरचा राजा’ मित्रमंडळाने फुलांची सजावट केली आहे मंडळाचे हे १४ वे वर्ष आहे. निखिल गुजर अध्यक्ष आहेत. येथील फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करत आहे.

विद्युत रोषणाईचा देखावा
मातोश्री कॉलनी लक्ष्मणनगर, थेरगांव येथील मातोश्री मित्र मंडळ २६वे वर्ष साजरे करत आहे. विद्युत रोषणाईचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला आहे. दिगंबर शेटे अध्यक्ष आहेत.

उलगडला शंभुराजांचा जीवनपट
दत्तनगर-थेरगाव येथील जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे हे ३५ वे वर्ष आहे. मंडळाने शिवपुत्र शंभूराजे, संभाजी महाराज यांच्या जीवनपट हा जिवंत देखावा साकारला आहे. गणेश गुजर हे अध्यक्ष आहेत.

मोरपिसांचे सिंहासन, बाहुबलीचा सेटअप
थेरगाव गावठाणातील ‘गार्डनचा राजा’ मित्रमंडळ ट्रस्टने २२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाने मोरपिसांचे सिंहासन व बाहुबली सेटअप हा देखावा केला आहे. प्रशांत कर्डे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com