हिंजवडी, माण-मारुंजीतील रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणांची भीती
हिंजवडी, ता. २२ : वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने हिंजवडी-माण, लक्ष्मी चौक, मारुंजी रस्त्यांच्या रुंदीकरणाला अद्याप मुहूर्त न लागलेला नाही. दोन महिने उलटूनही रस्त्यांवरचा राडारोडा पडून आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिक आणि आयटीयन्स वैतागले असून रस्त्यांवर हळूहळू पुन्हा अतिक्रमणे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामांना मुहूर्त लागणार तरी कधी ? असा सवाल आयटीयन्ससह रहिवासी विचारत आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये हजारो आयटी कर्मचारी दररोज ये-जा करतात. या परिसरातील रस्ते अरुंद आहेत. त्यातच अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. पावसाळ्यात; तर परिस्थिती आणखी बिकट होऊन रस्त्यांवर खड्डे, पाणी साचणे आणि अपघातांची शक्यता वाढते. त्यावर पीएमआरडीएसह विविध प्रशासकीय यंत्रणांवर टिकेची प्रचंड झोड उठल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी परिसराचा दोनदा दौरा केला. तसेच हिंजवडीतील पायाभूत सुविधांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेतली. त्यात रस्ता रुंदीकरण, रिंग रोड, उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
मोबदल्याबाबत स्पष्ट उत्तर मिळाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी सहकार्य करत रस्त्यांतील शेकडो बांधकामे स्वतः हून काढली. माण, बापूजी बुवा खिंड ते कासारसाई हा सुमारे बारा किमी पर्यंतचा राज्य मार्ग (क्र.१३०) आहे. माण ते पांडवनगर, हिंजवडी, पांडवनगर ते छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक ते मेझा नाईन चौक, लक्ष्मी चौक ते मारुंजी पर्यंतच्या रस्त्यांतील हजारो अतिक्रमणांचा त्यात समावेश राहिला. मात्र, दोन महिने उलटूनही रस्त्यांचे रुंदीकरण झाले नसून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
परतीचा पाऊस अन् राडारोडा
अधून मधून जोरदार बसणाऱ्या परतीच्या पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. हा पाऊस सुरू होण्याआधी कामांना सुरुवात होणे गरजेचे होते. मात्र ते झाले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर पीएमआरडीएने १६६ हून अधिक अतिक्रमणे हटविली. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी अद्यापही या रस्त्यांत राडारोडा तसाच पडून आहे. त्यामुळे, रस्ता वापरात येत नाही. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पीएमआरडीए भूसंपादन प्रक्रिया राबवित आहे. ती पूर्ण होताच प्रत्यक्षात काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) करणार आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी २१ ऑगस्टनंतर कोणतीही ठोस प्रक्रिया झालेली नाही. पायाभूत सुविधांमध्ये एक टक्काही बदल झालेला नाही. लक्ष्मी चौकातील खड्ड्यांमुळे वाहतूक नियंत्रण कठीण झाले आहे. परतीच्या पावसाने रस्त्यांची आणखी दुरवस्था झाली आहे. आयटी कर्मचारी आणि रहिवासी या विलंबामुळे त्रस्त आहेत. दररोज तासंतास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. पण, सरकार फक्त घोषणा करत आहे.
- आनंद चौगुले, आयटी कर्मचारी
ग्रामस्थांनी रस्ते स्वतःहून मोकळे करून देत सहकार्य केले आहे. आयटीतील रस्ते मोठे असणे ही बाब सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे. मात्र, अद्याप प्रशासकीय संस्थांकडून कुठलीच ठोस हालचाल दिसत नाही. परतीचा पाऊस येण्याआधी कामे होणे गरजेचे होते. कामे रखडल्याने आता पुन्हा हे रस्ते अतिक्रमणांनी व्यापण्याची शक्यता आहे.
- वसंत साखरे, ग्रामस्थ, हिंजवडी
सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू असून विविध स्वरूपातील मोबदल्याच्या प्रस्तावाबाबतची जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीला ज्या जागा ताब्यात आहेत. त्याठिकाणी सात मीटरचे रस्ते करण्याचे प्रयत्न आहेत. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होताच काही रस्ते ‘पीडब्ल्यूडी’ तर काही रस्ते ‘एमआयडीसी’ करणार आहे.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.