थेरगावाचा डांगे चौक मोकळा; मात्र रस्त्यांवर वाहनांच्या रांगा

थेरगावाचा डांगे चौक मोकळा; मात्र रस्त्यांवर वाहनांच्या रांगा

Published on

वाकड, ता. ६ : वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन वाहतूक पोलिस व महापालिकेने थेरगावातील डांगे चौकात वाहतूक नियंत्रक दिव्यांची यंत्रणा कार्यान्वित केली. सुरुवातीच्या काही दिवसांचा गोंधळ वगळता पूर्वीच्या तुलनेत चौकातील विस्कळीतपणा, बेशिस्तपणा नाहीसा झाला आहे. मात्र, या निर्णयाला काही वाहनचालक व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत असून वाहतूक नियंत्रक दिव्यांमुळे वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाल्याचा आरोप करत आहेत.
थेरगावातील डांगे चौक हा शहरातील सर्वाधिक गजबजलेला व वर्दळीचा चौक. थेरगाव, वाकड, रहाटणी, हिंजवडी आणि पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या रस्त्यांचा मुख्य केंद्र असल्याने येथे वाहतुकीचा भार प्रचंड आहे. गेल्या महिन्यात वाकड वाहतूक पोलिसांनी डांगे चौकात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियंत्रक दिवे सुरू केले. तेव्हा, काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण राहिले. त्यानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त विशाल गायकवाड यांनी भेट देऊन चौकाची पाहणी करुन स्थानिक वाकड वाहतूक विभागाला काही सूचना व पर्याय सुचविले. त्यानुसार चौकातील सर्वच बाबी, चहुबाजूंच्या वाहनांचा कमी-अधिक प्रमाणाची रहदारी यांचा अभ्यास करुन गेल्या आठवड्यापासून येथे कायमस्वरुपी वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करण्यात आले आहेत.

व्यापाऱ्यांचे म्हणणे काय ?
- ग्रेडसेपरेटरच्या कामात आमच्यावर अन्याय
- ग्रेड सेपरेटमुळे रस्ता अरुंद झाला
- आता वाहतूक नियंत्रक दिवे सुरू केल्याने मोठी कोंडी
- चारही दिशांच्या निमुळत्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा
- व्यवसाय, उद्योग ठप्प झाले


रहिवाशांकडून स्वागत
या परिसरातील रहिवासी व पादचाऱ्यांकडून बदलाचे स्वागत केले जात आहे. वाहतूक नियंत्रक दिव्यांची सवय नसल्याने गोंधळ उडत आहे. काही दिवसांत लोकांना सवय लागेल आणि चौकामधून शिस्तबद्ध वाहतूक चालू होईल, असेही काहींचे म्हणणे आहे.

वाहतूक नियंत्रक दिव्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी वाहतुकीच्या उपाययोजना व ‘लेफ्ट फ्री’ केले नाही. सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पूर्वी रविवारचा आठवडे बाजार वगळता वाहतूक नियंत्रक दिवे नसतानाही कधीच डांगे चौक जाम होत नसे. पण, दिवे सुरू झाल्यापासून दररोज मोठी कोंडी होत आहे. बेकायदा पार्किंग आणि कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिका ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रक दिवे कायमचे बंद करुन वाहतुकीचा खोळंबा दूर करावा.
- संतोष डांगे, व्यापारी, डांगे चौक


डांगे चौक हा शहरातील महत्वाचा मध्यवर्ती भाग आहे. पूर्वी वाहतूक नियंत्रक दिवे नसल्याने कोणीही यावे कधीही जावे, अशी स्थिती होती. पादचाऱ्यांना धोका पत्करुन ये-जा करावी लागत. वारंवार अपघात होत असत. अप्पर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांचे वाहतूक कोंडी सोडविण्यावर बारकाईने लक्ष आहे. त्यांच्या सूचनेनुसार बदल केले आहेत. आणखी बदल व सुधारणा केल्या जातील. दिव्यांमुळे रहदारीला शिस्त लागली असून अपघात शून्यावर आले आहेत.
- मधुकर थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक

WKD25A09612

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com