विकास हवा, मृत्यू नको !, निष्पाप बळींना जबाबदार कोण ?

विकास हवा, मृत्यू नको !, निष्पाप बळींना जबाबदार कोण ?

Published on

हिंजवडी, ता. ११ : हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील खराब रस्ते, पोलिसांचे दुर्लक्ष आणि अवजड वाहनांच्या रहदारीमुळे अपघातांचे सत्र चालूच आहे. त्याच्या निषेधार्थ रहिवासी, आयटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी (ता.११) दहा वाजता शांततामय मार्गाने निदर्शने केली. राज्य सरकार आणि संबंधित शासकीय यंत्रणांबद्दल रोष व्यक्त करुन ‘विकास हवा, मृत्यू नको !, निष्पाप बळींना जबाबदार कोण ? अशा आशयांचे फलक झळकाविले.
फेज एक येथील स्ट्रीट्स ऑफ युरोप मॉलसमोर हे आंदोलन करण्यात आले. अनक्लोग हिंजवडी मोहिमेचे सचिन लोंढे यांच्यासह आयटी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, आयटी रहिवासी, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक असे सुमारे २०० हून अधिक नागरिक आंदोलनात सहभागी झाले.
पांडवनगरमध्ये भारती मिश्रा (वय ३४, रा. थेरगाव) या महिलेला शुक्रवारी सिमेंट मिक्सरने चिरडले. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना निदर्शकांनी हातात विविध आशयाचे फलक घेतले. गेल्या काही महिन्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी परिसराला अनेक वेळा भेटी दिल्या. मात्र, पीएमआरडीए, एमआयडीसी यासारख्या प्रशासकीय संस्था आणि यंत्रणा हिंजवडी आसपासच्या भागांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल झालेला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. आश्वासने दिली जातात; पण अंमलबजावणी होत नाही. रस्ते, वाहतुकीचे नियोजन आणि सुरक्षा याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप आंदोलक आनंद चौगुले यांनी केला.

प्रवेशबंदीचे सर्रास उल्लंघन
रस्त्याची वाईट अवस्था आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पांडवनगरमधील अपघाताची घटना घडली. जड वाहनांना या परिसरात प्रवेशबंदी असली तरीही अशी वाहने सर्रास धावत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हिंजवडी परिसरातील रहिवाशांना मूलभूत सुविधा द्याव्यात, अपघातांप्रकरणी, मालकांनाही जबाबदार धरले जावे, पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी ठोस पावले उचलावीत, रस्त्यांची दुरुस्ती, वाहतुकीचे योग्य नियोजन, जड वाहनांवर कठोर बंदी अशा मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.

आम्हाला न्याय मिळत नाही
दोन महिन्यांपूर्वी, ऑगस्ट २०२५ मध्ये ११ वर्षीय प्रत्युषा संतोष बोराटे हिचाही असाच अपघात झाला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. या निदर्शनात प्रत्युषाची आई वैशाली बोराटे यांनीही भाग घेतला. माध्यमांशी बोलताना त्यांनी रस्ते सुरक्षेकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्याय मिळत नाही. बंदी असतानाही जड वाहने का धावतात ? असा सवालही त्यांनी केला.
WKD25A09658

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com