वाहतूक कोंडीचे ‘लॉगऑफ’; शांततेचे ‘लॉग इन’

वाहतूक कोंडीचे ‘लॉगऑफ’; शांततेचे ‘लॉग इन’

Published on

हिंजवडी, ता. २१ : ‘आयटी हब’ हिंजवडी- माण परिसरातील वाहतुकीलाही शुक्रवारपासून ‘दिवाळी बोनस’ सुटी मिळाली आहे. आयटी कंपन्यांमधील कर्मचारी आणि इतर नोकरदार वर्ग त्यांच्या मूळगावी रवाना झाल्याने परिसरात एक विलक्षण शांतता पसरली आहे. त्यामुळे, सध्या वाहतूक कोंडीचे ‘लॉगऑफ’; शांततेचे ‘लॉग इन’ झाल्याचे दिसून येत आहे.
हिंजवडी - माण रस्ता, फेज तीन मेगा पॉलीस चौक, माण परिसर, पांडवनगर, छत्रपती शिवाजी चौक, लक्ष्मी, क्रोमा चौक, वाकड-हिंजवडी रस्ता, द कॉडर्न कंपनी परिसर, भूमकर चौक, विनोदेनगर चौक व अन्य परिसर नेहमी वाहनांच्या रांगा, कर्णकर्कश हॉर्न आणि धावपळीने गजबजलेला असतो. तो आता जवळपास निर्जन वाटत आहे. सकाळ- संध्याकाळ कामावर जाणाऱ्या-येणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या वाहनांमुळे चालकांना रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक कर्मचारी आपल्या मूळगावी गेल्याने रस्त्यांवरील रहदारी कमालीची घटली आहे. काहीजण रेल्वे, खासगी बस, विमान तर काही स्वतःच्या वाहनांनी घराकडे गेले आहेत. त्यामुळे हिंजवडीतील वसतिगृहे, पेइंग गेस्ट आणि भाड्याच्या घरांमध्येही बराचसा भाग रिकामा झाला आहे.
रिक्षाचालक संदीप रोकडे म्हणाले, ‘‘नेहमी रस्त्यावर वाहनांची रांग लागते. पण, गेल्या दोन दिवसांपासून रस्ता मोकळा आहे. प्रवासीही फार कमी दिसत आहेत. बाजारपेठांमधील रेलचेल थंडावली असून सायंकाळीच्या खरेदीसाठी आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी परिसरातील बाजारपेठांत शुकशुकाट दिसत आहे. प्रवासी भाड्यातही मोठी घट झाली आहे. माण गावाजवळील रस्त्यालगतच्या फळबाजार, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि छोट्या-मोठ्या दुकानांमधील ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.’’

पुढील महिन्यात पुन्हा गजबज
दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयटी कर्मचारी आणि नोकरदार वर्ग परत हिंजवडीत येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पुन्हा एकदा या परिसरातील रस्ते, बाजारपेठा आणि आयटी पार्क परिसर गजबजून जाईल. तोपर्यंत मात्र, हिंजवडी-माणसह आयटी परिसरातील शांतता आणि बाजारपेठांमधील शुकशुकाट हा एक अनोखा अनुभव स्थानिकांना देत आहे.


दिवाळी हा सण कुटुंबासोबत साजरा करण्याची संधी असते. त्यामुळे मी माझ्या गावी चेन्नईला जाते. येथील धावपळीच्या आयुष्यातून काही दिवस सुटका मिळते. हिंजवडी परिसरातील स्थानिक रहिवाशांना या शांततेचा अनुभव काहीसा नवीन आहे. पण ही शांतता तात्पुरतीच आहे, कारण लवकरच हा परिसर पुन्हा त नेहमीच्या चैतन्याने आणि गजबजाटाने भरून जाईल.
- हरिणी कंदाला, आयटी कर्मचारी, माण


दिवाळीच्या आधी खरेदीसाठी खूप गर्दी असते. पण, आता अनेकजण गावी गेल्याने आमच्या दुकानात ग्राहक कमी झाले आहेत. तरीही काही स्थानिक आणि काही आयटी कर्मचारी येत आहेत. त्यामुळे थोडीफार विक्री होत आहे.
- प्रकाश चौधरी, किराणा दुकानदार, हिंजवडी

सध्या आयटी कपंन्या बंद आहेत. आयटी कर्मचारी दिवाळीसाठी गावी गेल्याने आयटीत ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यांवर तुरळक वाहने धावत आहेत. या संधीचा फायदा घेत आम्ही अवजड वाहनांना लगाम लावण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मालकांना नोटिसा बजावून ‘नो एंट्री’सह अन्य मार्गदर्शक वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृतीपर मोहीम राबवत आहोत.
- राहुल सोनवणे, पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग


बहुतेक नागरिक व आयटीआय गावी गेल्याने शुकशुकाट आहे. त्याने सध्यातरी कोंडीच्या किंवा अन्य समस्या नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत आमच्यावरचा ताण देखील मोठा कमी झाला आहे.
- मधुकर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक वाकड वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com