बाजारांच्या गर्दीत हरवली स्वच्छता, सुरक्षा

बाजारांच्या गर्दीत हरवली स्वच्छता, सुरक्षा

Published on

आठवडे बाजारांचा ‘बाजार’

वाकड, ता. ७ : एकेकाळी शेतकऱ्यांकडून थेट घरी पोहोचणाऱ्या ताज्या भाज्या आणि फळांच्या आनंदाची जागा आता वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि असुरक्षितेने घेतली आहे. शहरात ठिकठिकाणी बेकायदा थाटण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांमुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि अपघात वाढले आहेत. नाव ‘आठवडे बाजार’ असले, तरी हे ‘बाजार’ रोजच विविध चौकांवर बस्तान मांडत आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे.

महापालिका प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करुन शहरातील प्रमुख चौकाचौकांत आणि रस्त्यांवर बेकायदा बाजार सर्रास थाटले जातात. काही ठिकाणी आठवड्यातून एक दिवस सुरू झालेले बाजार आता दररोज भरू लागले आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या या बाजारांमुळे वाहनचालकांना कोंडीतून मार्ग काढणे कठीण झाले आहे. विनोदेनगर, वाकड, थेरगाव, काळाखडक, चौधरी पार्क, रावेत, हिंजवडी, काळेवाडी, रहाटणी, भोसरी, चिंचवडगाव आदी भागांत अशीच स्थिती आहे.
या बाजारांमुळे पदपथ व्यापले गेले असून पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून जावे लागते आहे. या स्थितीमुळे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत तर वाहतूक ठप्प होते. अनेकवेळा शाळकरी मुले आणि दुचाकीस्वार यांच्यात किरकोळ अपघातही होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फळविक्री, भाजीपाला व अन्य स्टॉल्स लावल्याने वाहनांना जागा उरत नाही. सार्वजनिक वाहतूकही अडखळते. परिणामी, कोंडी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण होते. विशेषतः गर्दीच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होते.

कचऱ्याच्या प्रमाणात वाढ
या बाजारांत कचऱ्याचे प्रमाण वाढले असून, उरलेला भाजीपाला व प्लॅस्टिक कचरा रस्त्यावरच टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. अंधारात वीजपुरवठा नसल्याने चोरी आणि वादांच्या घटनादेखील वाढल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

प्रशासनाची उदासीनता
महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून समन्वयाने कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या बेकायदा बाजारांना उत्तेजनच मिळत आहे. नागरिकांनी तक्रारी केल्या, तरी तात्पुरती कारवाई करून विषय ‘गुंडाळला’ जातो. रस्त्यावरील या बाजारांमुळे सगळ्यांचा वेळ वायाच जातो. प्रशासनाने ठराविक जागीच अधिकृत बाजारांचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


आमच्या भागात चार दिवस चौक बदलून आठवडे बाजार थाटला जातो. त्यामुळे वाहतुकीचा आणि पादचाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. चौकाचौकात थाटणाऱ्या या बाजारांविरुद्ध कायमस्वरुपी कारवाई व्हावी. अन्यथा त्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध करुन द्याव्यात.
- भास्कर गायकवाड, सोसायटी रहिवासी, वाकड

आठवडे बाजारांचे पेव फुटले आहे. दुप्पट भावाने भाज्या विकून ग्राहकांची यात फसवणूक सुरू आहे. हे वाढते अतिक्रमण सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहेत. बाजारानंतर रस्त्यावर घाण टाकली जाते. महापालिकेने स्वच्छता पथके नेमावीत. पोलिसांनी वाहतूक नियोजन करावे.
- ललिता कोंडे, रहिवासी, वाकड रस्ता, थेरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com