हिंजवडीत शांतता पदयात्रेतून रस्ता सुरक्षा जागृती

हिंजवडीत शांतता पदयात्रेतून रस्ता सुरक्षा जागृती

Published on

हिंजवडी, ता. १६ : जागतिक रस्ते अपघात बळी स्मरण दिनानिमित्त आयटी पार्क हिंजवडीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. ‘लॉस्ट टॅलेंट’ अशी यंदाची संकल्पना होती. माण, हिंजवडी फेज-एक येथील यश-वन सोसायटी परिसरात रहिवासी आणि परिवहन आयुक्त कार्यालय यांच्यावतीने शांतता पदयात्रा काढण्यात आली.

पदयात्रेनंतर मल्टिपर्पज हॉलमध्ये रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आपल्या प्रियजनांना अपघातांत गमावलेल्या अनेक पीडित व्यक्तींलह अनुभव मांडत रस्ता सुरक्षेची गरज अधोरेखित केली. हिंजवडीतील सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू झालेल्या प्रत्युषा हिचे वडील संतोष बोराटे यांनी ‘‘रस्ते सुरक्षित नसतील, तर कुणाचेच भविष्य सुरक्षित नाही,’’ असे सांगत वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले.
हरिनी कंडाला म्हणाल्या, ‘‘अपघातानंतर परिसरातील मुलांवर तीव्र मानसिक परिणाम झाला आहे.’’ स्वप्नील ठाकूर यांनी ड्रेनेज झाकले नसल्याने झालेल्या गंभीर अपघाताचा अनुभव सांगितला.
समीर देशमुख म्हणाले, ‘‘लेह-लडाखमध्ये झालेल्या अपघातात पाय गमावला. शरीरासह मनावरही मोठी जखम झाली.’’ हिना वर्दाम म्हणाल्या, ‘‘रावेत येथे ट्रकच्या धडकेत गंभीर दुखापत झाली. पुनर्वसन झाले, पण रस्त्यावर पाऊल टाकण्याची भीती अजूनही सोडत नाही.’’
बीजीव्ही संस्थेचे प्रियांश जावळे आणि वेदव्यास मोरे यांनी उपस्थितांना ‘गुड समारिटन कायदा’ व त्यासाठी विकसित जी - समारिटन ॲपविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी अपघातात जीव वाचविणारे डॉक्टर भारत भोसले, तसेच रुग्णवाहिका चालक योगेश पोकळे यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांनी रस्ते सुरक्षेची शपथ घेतली.
महादेव धोत्रे, हरिनी कांडला, रवी सिन्हा यांनी या उपक्रमास सहकार्य केले. परिसर संस्थेचे आदित्य चावंडे, श्वेता वर्णेकर, पौर्णिमा घबाले, मधुमिता सावंत, मृणाल घाडगे-जननी यांनी नियोजन केले.

अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत सुरक्षित परिवहनही आजची अत्यावश्यक गरज आहे. प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हीच खरी जबाबदारी आहे.
- सविता पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

हिंजवडीत वाहतूक अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात येत आहे. अपघातस्थळी लोकांनी फक्त फोटो-व्हिडिओ न काढता तातडीने मदत केली पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होण्यास मदत होईल.
- राहुल सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग

राज्यात दररोज सरासरी ९७ अपघात, ४२ मृत्यू
परिसर संस्थेचे सुशील पठारे यांनी ‘केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग अपघात अहवाल २०२३’ मधील महाराष्ट्राच्या आकडेवारीचे यावेळी विवेचन केले. ‘‘देशात २०२३ मध्ये ४ लाख ८० हजार ५८३ अपघातात १ लाख ७२हजार ८९० मृत्यू व ४ लाख ६२ हजार ८२५ जखमी झाले असून २०२२ च्या तुलनेत अपघात, मृत्यू आणि जखमी सर्वच वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात ३५, २४३ अपघात नोंदवले जाऊन राज्याचा देशात सहावा क्रमांक, तर मृत्यूंसह तिसरा क्रमांक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्यात दररोज ९७ अपघात आणि ४२ मृत्यू म्हणजे दर तासाला दोन जीव जातात,’’ असे सांगितले.

WKD25A09832

Marathi News Esakal
www.esakal.com