वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी

वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी

Published on

वाकड, ता. १८ : ‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि वाकड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, पदपथांवर, अगदी नो-पार्किंग झोनमध्येही दुचाकी-चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या गर्दीच्या वेळेत सर्वांचाच खोळंबा होत आहे.
या भागातील बहुतेक पदपथ ‘अर्बन स्ट्रीट’ पद्धतीची असल्याने आधीच रस्ते लहान आणि पदपथ मोठे झाले आहेत. मात्र, अनधिकृत पार्किंग सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे या पार्किंगवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कडक कारवाई होणे आवश्यक आहे. या बेकायदा पार्किंगमुळे अनेकदा वाहतूक व्यवस्था कोलमडते. दररोज हजारो आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक या समस्येला बळी पडत आहेत.
फिनिक्स मॉल परिसर, वाकड फाटा, डांगे चौक, मंगलनगर, दत्त मंदिर रस्ता, पिंक सिटी रस्ता, छत्रपती चौक, वाकड पोलिस ठाणे परिसर, केटीसी मॉल, हिंजवडी गावठाण रस्ता, हिंजवडी पोलीस ठाणे परिसर, वाकड-हिंजवडी रस्ता, लक्ष्मी चौक आदी भागात बेकायदा पार्किंगची समस्या गंभीर आहे. सतत वाहतूक कोंडीच्या गर्दीत अडकलेल्या भूमकर चौकाजवळील काळाखडक चौकात वाहतूक कोंडी होत आहे.

नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. सोसायटींसमोरील रस्त्यावर, चारचाकी, मालवाहू, दुचाकी वाहने उभी केली जातात. पदपथ पूर्ण व्यापल्याने मुले, ज्येष्ठ नागरिकांना धोकादायक परिस्थिती आहे. पादचारी मार्ग खुले करण्याबाबत येथील रहिवासी महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रसाशनाकडे वारंवार तक्रारी करतात. पण, हा मुद्दा कोणीही गंभीर्याने घेत नसल्याचा आरोप होत आहे.


अनेकदा ५-१० मिनिटांचा प्रवास ४५ मिनिटांवर जातो. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी असतात. फक्त एकच मार्गिका खुली राहते. त्यात रिक्षा-बस मार्ग अडवतात. त्यामुळे रस्ता जाम होतो.
- रणजीत गडदे, वाहनचालक

पार्किंगची जागा नाही म्हणून लोक कुठेही वाहने लावतात.त्यामुळे आम्हाला त्रास होतो. रोज दोन-तीन तास वाया जातात. काहींनी तर ऑफिसची वेळ सकाळी ८ किंवा दुपारी १२ पर्यंत बदलली आहे, तरीही फायदा होत नाही.
- मोहित मंगल, आयटी कर्मचारी

वाकड-हिंजवडी भागात पार्किंगची मोठी समस्या आहे. आम्ही वारंवार वाहनांवर बेकायदा पार्किंगची कारवाई करत आहोत. टोइंग व्हॅनद्वारे दररोज वाहने उचलली जातात. मात्र, पार्किंगची मूलभूत सुविधाच कमी आहे. आम्ही महापालिकेला वारंवार पत्र लिहिले आहे की, रस्त्याकडेला नो पार्किंग बोर्ड आणि अन्य उपाययोजना कराव्यात.
- विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग

हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि वाकड, थेरगाव परिसरात बेकायदा पार्किंग होऊ नये म्हणून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांबरोबर समन्वय वाढवला जाईल.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com