‘हिंजवडी मॉडेल’चे माझे व्हिजन नक्कीच पुढे घेऊन जाणार’
हिंजवडी, ता. ५ : ‘‘हा माझा युवा सहकारी आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे. काम करण्याची धमक आहे. ‘हिंजवडी मॉडेल’चे माझे व्हीजन नक्कीच पुढे घेऊन जाणार...’’, अशा आशयाच्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाजातील एआय निर्मित ‘व्हॉइस क्लिप’चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून समाज माध्यमांवर वापर केला जात आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असताना प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाजाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिप्स समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केल्या जात असून, त्यातून उमेदवारांकडून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
या व्हॉइस क्लिपमध्ये अजित पवार यांचा आवाज जणू एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देत त्याचे कौतुक करीत असल्याचा आभास निर्माण करतो. मात्र, या क्लिप्स एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केल्या आहेत. तरी यामुळे मतदार मात्र भावनिक होत आहेत. निवडणूक प्रचारात भावनिक मुद्द्यांचा वापर होत असतानाच, दिवंगत नेत्यांच्या आवाजाचा अशा प्रकारे वापर करणे लोकशाही मूल्यांच्या मर्यादा ओलांडणारे असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटू लागली आहे.
राजकीय अभ्यासकांच्या मते, हा प्रकार निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या चौकटीत येतो का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने मतदारांची दिशाभूल होत असल्यास निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत दरम्यान, सुजाण मतदारांनी समाज माध्यमांवरील अप्रामाणिक व भावनिक आशयाला बळी न पडता उमेदवारांची कामगिरी, भूमिका आणि विकासाच्या मुद्द्यांवरच मतदान करावे, असे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

