लोणावळा-खंडाळा सुनेसुने; कोरोनाचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका

भाऊ म्हाळसकर
मंगळवार, 14 जुलै 2020

ऐन हंगामात लोणावळा, खंडाळ्यात कोरोना महामारीमुळे पर्यटन व्यवसाय कोलमडला असून, बड्या हॉटेलसह हंगामात किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे.

लोणावळा (पुणे) : ऐन हंगामात लोणावळा, खंडाळ्यात कोरोना महामारीमुळे पर्यटन व्यवसाय कोलमडला असून, बड्या हॉटेलसह हंगामात किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. लोणावळा, खंडाळ्यासह मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे नेहमी गजबजलेली असतात. त्यातही सध्या पावसाळी पर्यटन, वर्षाविहाराचा नवीन ट्रेंड पहावयास मिळत आहे. पावसाळ्यात तर पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. मात्र, सध्या ही सर्व पर्यटन स्थळे आणि हिलस्टेशन्स लॉकडाउन झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरणही भरून ओसंडून वाहू लागले आहे. मात्र, भुशी धरणासह मावळ तालुक्यातील ३१ पर्यटनस्थळांवर शासनाच्या वतीने पर्यटनास बंदी घातली आहे. विनापरवानगी व विनाकारण फिरणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला जात असून, गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळ्यातील सर्व पर्यटनस्थळे ओस पडली असून, पर्यटननगरी आर्थिक संकटात सापडली आहे. पर्यटन व्यवसाय कात्रीत सापडल्याने येथील व्यावसायिकांना 'बुस्टर' देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात लहान मोठी मिळून जवळपास २०० हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. गेले चार महिने हॉटेल, रिसॉर्ट बंद आहेत. शासनाच्या वतीने सध्या लॉकडाउन अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे येणाऱ्या हंगामात पर्यटकांची शाश्वती नसल्याने हॉटेल व लॉज व्यावसायिक हैराण झाले आहेत. 

हंगामी व्यवसायावर अनेकांचे संसार

सर्व हंगामात पर्यटकांची येथे गर्दी असते. पावसाळी हंगामातील जून ते ऑगस्टदरम्यान हंगामी स्वरूपात या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात चिक्की, भजी, वडापावच्या गाड्या, मक्याचे कणीस तसेच, इतर हंगामी व्यवसाय करणाऱ्यांची सख्या हजारोंच्या घरात आहे. पावसाळी हंगामात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. त्यामुळे या तीन महिन्यांमध्ये लोणावळा परिसरातील अनेक नागरिकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. याच तीन महिन्यांच्या हंगामी व्यवसायावर अनेकांचे संसार उभे राहतात. मात्र, सध्या सर्व पर्यटनस्थळे ओस पडल्याने अनेकांपुढे घरगाडा चालवायचा कसा? असा प्रश्न आहे. पर्यटकच नसल्याने रिक्षा आणि टॅक्सी सेवेवरही परिणाम झाला आहे. पर्यटकनगरीत शुकशुकाट असल्याने टॅक्सी सेवेवर पर्यायाने येथील स्थानिक नागरिकांवर  उपासमारीची वेळ आली आहे. त्यात बहुतांशी व्यावसायिकांनी कर्ज काढून नवीन वाहने खरेदी केली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्ज फेडायची कसे, असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे आहे. 

चिक्की व्यवसायास मोठा फटका

सध्या चिक्कीचे उत्पादन पूर्णपणे ठप्प आहे. स्थानिक पातळीवर चिक्की फारशी विकली जात नाही. चिक्की व्यवसायाचे भवितव्य पर्यटनावर असते. चिक्की खरेदीमध्ये जवळपास ९० ते ९५ टक्के वाटा हा पर्यटकांचा असतो. बाजारपेठा थंड झाल्याने चिक्की उत्पादकांसह विक्रेते आणि कामगारांवर सक्रांत आली आहे. अनेकांना घरी बसावे लागले आहे.  व्यवसाय ठप्प झाल्याने पर्यटननगरीचा अर्थव्यवस्थेसह कामगार वर्गासह व्यावसायिकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेले चार महिने येथील  हॉटेस, रिसॉर्ट सुरू होऊ शकलेली नाही. कोरोनाच्या धोक्यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे. त्यांना शासनाच्या वतीने मदतीचा बुस्टर देण्याची गरज असल्याचे मत लोणावळा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अल अझहर कॉन्ट्रॅक्टर यांनी व्यक्त केले. शासनाने निदान वीज बील तसेच, करात सवलत दिली तरी फार मोठा हातभार लागेल असे ते म्हणाले. 

भुशी धरण भरले आहे. मात्र, लोकच नसल्याने दुकान लावायचे कोणासाठी हा प्रश्न आहे. पुढेही शाश्वती नसल्याने यंदाचा हंगाम वाया जाणार असून, मोठा आर्थिक बोजा सहन कसा करायचा, अशी प्रतिक्रिया भुशी धरण येथे तात्पुरते हॉटेल व्यवसाय करणारे व्यावसायिक व धरणावरील जीवरक्षक साहेबराव चव्हाण यांनी व्यक्त केली. 

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourism business stopped at lonavla khandala due to corona lockdown