लोणावळा-खंडाळा पर्यटकांनी गजबजले; हॉटेल्स, रिसॉर्ट 'फुल्ल' 

भाऊ म्हाळसकर
Sunday, 6 September 2020

राज्य सरकारने प्रवासासाठी 'ई पास'ची अट शिथिल केल्यानंतर लोणावळा, खंडाळ्यात गेले दोन दिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे.शहरातील सर्व रिसॉर्टस्‌, हॉटेल्स, बंगले जवळपास फुल्ल आहेत.

लोणावळा : राज्य सरकारने प्रवासासाठी 'ई पास'ची अट शिथिल केल्यानंतर लोणावळा, खंडाळ्यात गेले दोन दिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे.शहरातील सर्व रिसॉर्टस्‌, हॉटेल्स, बंगले जवळपास फुल्ल आहेत. मात्र, दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांना कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लोणावळ्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. कोविड 19 पार्श्‍वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल, रिसॉर्ट गेले सहा महिने बंद आहे. चिक्की उत्पादक, लहान-मोठे विक्रेते, टुरिस्ट व्यवसायावर संक्रांत आली. मंदीचे सावट असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. सहा महिन्यांनंतर दुकाने खुली झाली. सरकारने प्रवासासाठी ई पासची अट रद्द केली. त्यामुळे सहा महिन्यांनंतर पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. यात प्रामुख्याने मुंबई, गुजरातमधील पर्यटकांचा भरणा अधिक आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे शनिवार व रविवारी वाहतूक व्यवस्थेवर ताण आला. पुणे-मुंबई महामार्गावर महावीर चौक तसेच वरसोली टोलनाक्‍यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिस कर्मचारी वाहतूक नियमन करताना दिसले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा 'विसर' 

एकीकडे पर्यटकांची होत असलेली गर्दी तर दुसरीकडे कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या यामुळे चिंता निर्माण व्यक्त होत आहे. राज्य सरकारने रिसॉर्ट व लॉजिंग व्यवसायास परवानगी दिल्याने पर्यटकांना वास्तव्य करता येणार आहे. मात्र पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी कायम आहे. मात्र तरीही पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. रेस्टॉरंट्‌समध्येही गर्दीचे चित्र होते. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र असून सोशल डिस्टन्सिंगसह विना मास्कचा वावर सर्वांचीच चिंता वाढविणारा विषय आहे. लोणावळ्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेतीनशेच्या वर पोचली असून मृतांचा आकडा वीसवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर लोणावळ्यास पर्यटकांची पसंती मिळत आहे. शहरातील प्रमुख रिसॉर्ट, बंगल्यांमधील शनिवार व रविवारचे बुकिंग जवळपास फुल्ल असून, पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. 
- महादेव हिरवे, व्यवस्थापक, एमटीडीसी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourist crowd in lonavla khandala