भोसरीतील पदपथ रुंदीकरणास व्यापाऱ्यांचा कडाडून विरोध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

महापालिकेद्वारे बीआरटीएस विभागातर्फे येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलालगत असलेल्या सेवा रस्त्यालगतच्या पदपथाची रुंदी वाढविण्याचे काम सुरू केले आहे.

भोसरी : महापालिकेद्वारे बीआरटीएस विभागातर्फे येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलालगत असलेल्या सेवा रस्त्यालगतच्या पदपथाची रुंदी वाढविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, या कामाविषयी स्थानिक व्यापाऱ्यांना महापालिका आणि बीआरटीएसने विश्‍वासात घेतले नव्हते. याबाबत 'सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पदपथ रुंदीकरणाविरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी आवाज उठवला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या सभेत बीआरटीएसच्या अधिकाऱ्याला व्यापाऱ्यांनी फैलावर घेतले. व्यापाऱ्यांचे समाधान झाल्यावरच हे काम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे बीआरटीएसच्या अधिकाऱ्याने बैठकीत सांगितले. यावेळी नगरसेवक गव्हाणे, रवी लांडगे, सोने व्यापारी संजय उदावंत, भानुदास लांडगे, मदन कर्नावट, राम फुगे, अजित रमेश गव्हाणे, बाळासाहेब लांडगे, हेमंत खराबे, अविनाश फुगे, कैलास लांडगे, दत्तात्रेय गव्हणे, आजित फुगे, सागर काकडे, कैलास भांबुर्डेकर, नथू शिंदे यांच्यासह व्यापारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे-नाशिक महामार्गाचे दोन्ही बाजूकडील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाइनद्वारे विकसित करण्यात येत आहेत. या पदपथाची रुंदी साडेचार ते आठ मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सेवा रस्त्यालगत पार्किंगसह पदपथावर अतिक्रमण होऊ नये, याचे नियोजन करण्यात येणार असल्याचा दावा बीआरटीएसद्वारे करण्यात आला आहे. मात्र, हे काम विश्‍वासात न घेता सुरू केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. पदपथाच्या कामाबाबत 'सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच व्यापाऱ्यांनी एकत्र येत या रुंदीकरणास विरोध दर्शविला. 

यावेळी बीआरटीएसचे उपकार्यकारी अभियंता संजय साळी आणि अर्बन डिझाइनचे आर्किटेक्‍ट प्रसन्न देसाई यांनी पीपीटी आणि नकाशाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना पदपथाच्या रुंदीकरणाचा आराखडा समजून सांगितला. मात्र, त्यास व्यापारी आणि स्थानिकांनी कडाडून विरोध केला. दरम्यान, व्यापाऱ्यांचे समाधान झाल्यावरच कामाला सुरुवात करण्यात येईल, असे साळी यांनी आश्‍वासन दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पदपथाच्या रुंदीच्या कामाची विचारणा केली असता हे जिओचे काम सुरू असल्याची खोटी माहिती कर्मचाऱ्यांद्वारे देण्यात आल्याची माहिती कैलास लांडगे यांनी सांगितले. अर्बन सिटीचे नियोजन सेवा रस्त्याऐवजी चांदणी चौक ते लांडेवाडी चौकादरम्यानच्या रस्त्यावर होण्याची गरज अविनाश फुगे यांनी व्यक्त केली. सेवा रस्त्यासाठी आम्ही दिलेल्या जागेचा दुरुपयोग होत असल्यास स्थानिकांच्या जागा परत करण्याची मागणी अतुल फुगे यांनी केली. ज्या दुकानमालकांनी दुकानासमोर मोठी जागा सोडली आहे. पदपथाच्या रुंदीचे त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे मत राम फुगे यांनी व्यक्त केले. या वेळी बीआरटीएसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर येऊनही व्यापारी आणि स्थानिकांना कामाचे नियोजन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 

भोसरीतील जवळपास सर्वच रस्त्यावरील पदपथावर टपऱ्या आणि विविध वस्तू विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पदपथाचा उपयोग पादचाऱ्यांसाठी होत नाही. भोसरीत उद्यानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखाली उद्यानाऐवजी पार्किंगची व्यवस्था होणे झाली पाहिजे. 
- अजित गव्हाणे, नगरसेवक 

पदपथाची रुंदी वाढविल्यास रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. या रुंदीकरणाच्या कामापूर्वी स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता या कामाला सुरुवात केली आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या शंकाचे समाधान करूनच कामाला सुरुवात झाली पाहिजे. 
- रवी लांडगे, नगरसेवक 

रुंदी वाढविल्याने ग्राहकांच्या पार्किंगची समस्या निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे पदपथावर अतिक्रमण झाल्यास दुकाने थाटलेल्या व्यापाऱ्यांच्या व्यावसायावरही परिणाम होणार आहे. 
- संजय उदावंत, सोने व्यापारी, भोसरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traders strongly oppose widening of footpath in bhosari