भोसरीतील सिग्नल यंत्रणा ठरतेय 'शो पीस'; सात वर्षांपूर्वी बसवलेले दिवे अद्यापही बंदच!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

  • भोसरीतील तीन चौकांमधील स्थिती 

भोसरी : येथील भोसरी-आळंदी रस्ता चौक, भोसरी-दिघी रस्ता चौक, चांदणी चौक येथील वाहतूक नियंत्रक दिवे सुस्थितीत आहेत. मात्र, दिवे बसविल्यापासून केवळ एकदाच ते सुरू केले. त्यानंतर ते अद्यापपर्यंत बंद ठेवले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेद्वारे भोसरी-आळंदी रस्ता चौकात सात वर्षांपूर्वी, तर भोसरी-दिघी रस्ता चौक आणि चांदणी चौकात तीन वर्षांपूर्वी वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. भोसरी-आळंदी रस्ता चौक ते भोसरी-दिघी रस्ता चौक यामधील अंतर सुमारे दोनशे मीटर आणि भोसरी-दिघी रस्ता चौक ते चांदणी चौकातील अंतर सुमारे शंभर मीटर आहे. त्यामुळे या चौकातील अंतर कमी आहे. तसेच, पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर हातगाडीवाले, पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे सुरू ठेवल्यास वाहतूक सुरळीत होत नाही, असे कारण देत तत्कालीन वाहतूक निरीक्षकांनी वाहतूक नियंत्रक दिवे बंदच ठेवले होते. ते अद्यापही बंदच आहेत. जर हे दिवे सुरूच करायचे नव्हते, तर ते चौकात का बसविले?, असा प्रश्न वाहनचालक दिगंबर रायकर यांनी उपस्थित केला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोडे म्हणाले, "तीनही चौकात भोसरी वाहतूक विभागाच्या मागणीनंतर आणि त्यांच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. हे दिवे सुस्थितीत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत हे दिवे नादुरुस्त असल्याची तक्रार वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे केलेली नाही.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहनांची वर्दळ वाढल्यास वाहतूक नियंत्रक दिव्यांमुळे वाहतूक नियंत्रित करता येत नाही. अशा वेळी वाहतूक पोलिसांद्वारे गर्दीवर नियंत्रण करून वाहतूक सुरळीत केली जाते. त्यामुळे दिवे बंद ठेवले आहेत. 
- सुधीर अस्पत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic control lights are off in bhosari